scorecardresearch

शहरातील साठ टक्के रिक्षांच्या मीटरचे ‘कॅलिब्रेशन’ शिल्लक

रिक्षाला भाडेवाढ दिल्यानंतर त्यानुसार इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये करावे लागणारे बदल (कॅलिब्रेशन) शहरातील सुमारे ६० टक्के रिक्षा चालकांनी अद्यापही करून घेतले आहेत.

शहरातील साठ टक्के रिक्षांच्या मीटरचे ‘कॅलिब्रेशन’ शिल्लक

रिक्षाला भाडेवाढ दिल्यानंतर त्यानुसार इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये करावे लागणारे बदल (कॅलिब्रेशन) शहरातील सुमारे ६० टक्के रिक्षा चालकांनी अद्यापही करून घेतले आहेत. कॅलिब्रेशन करून घेण्यास ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली असून, या कालावधीत कॅलिब्रेशन करून न घेणाऱ्या रिक्षा चालकांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने दंडात्मक त्याचप्रमाणे परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.
रिक्षा चालकांना देण्यात आलेली भाडेवाढ १५ ऑक्टोबरपासून लागू करण्यात आली आहे. किलोमीटरनुसार इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये भाडेवाढीनुसार द्यावे लागणारे भाडे दिसण्यासाठी मीटरचे कॅलिब्रेशन करून घ्यावे लागणार आहे. भाडेवाढ लागू झाल्यापासून मीटरच्या कॅलिब्रेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, रिक्षा चालकांकडून कॅलिब्रेशनच्या या प्रक्रियेबाबत व त्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दराबाबत विविध तक्रारी करण्यात येत असल्याने ही प्रक्रिया संथ गतीने सुरू राहिली.
भाडेवाढ लागू झाल्यापासून मीटरच्या कॅलिब्रेशनसाठी रिक्षा चालकांना ४५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, या मुदतीत अनेक मीटरचे कॅलिब्रेशन झाले नसल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नुकतीच एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार आता कॅलिब्रेशन करून घेण्यास ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत कॅलिब्रेशन करून न घेतल्यास दंडात्मक कारवाईबरोबरच रिक्षाचा परवाना निलंबित करण्याची कारवाईही केली जाईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आला आहे. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2013 at 02:40 IST

संबंधित बातम्या