शहराशी संबंधित विविध विकासकामांचे नगरसेवकांनी दिलेले तब्बल ६११ ठराव महापालिका प्रशासनाकडे अभिप्रायासाठी पडून असल्याची वस्तुस्थिती माहिती अधिकारामुळे उघड झाली आहे. सन २००७ पासून दिले गेलेले हे ठराव अभिप्रायाच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यातील अनेक महत्त्वाच्या ठरावांवर प्रशासनाने अभिप्रायच दिलेले नाहीत.
शहरातील नव्या योजनांसाठी तसेच नव्या विकासकामांसाठी प्रथम संबंधित समितीकडे ठराव द्यावा लागतो. समितीत असा ठराव आल्यानंतर ते काम करण्याबाबत आधी महापालिका प्रशासनाचा अभिप्राय घेतला जातो. त्याकरिता ठराव अभिप्रायासाठी पाठवण्याची प्रक्रिया केली जाते. स्थायी, विधी, शहर सुधारणा समितीकडून वा मुख्य सभेकडून आलेल्या अशा ठरावांवर संबंधित खात्याने त्यांचा अनुकूल वा प्रतिकूल जो काही अभिप्राय असेल तो देणे अपेक्षित असते. मात्र, समित्यांकडून अभिप्रायासाठी आलेले असे शेकडो ठराव प्रशासनाने अभिप्राय न देता स्वत:कडेच ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्थायी समितीने सन २००७ पासून ते सप्टेंबर २०१३ पर्यंतच्या साडेसहा वर्षांत प्रशासनाकडे ९४१ ठराव अभिप्रायासाठी पाठवले आहेत. मात्र, त्यातील फक्त ३३० ठरावांवरील अभिप्राय प्रशासनाकडून आले असून उर्वरित ६११ ठराव प्रशासनाकडेच अभिप्रायासाठी पडून असल्याची माहिती नगरसेवक आबा बागूल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यातील अनेक ठराव शहराच्या विकासाशी संबंधित आहेत. तसेच अनेक ठराव महापालिकेचा महसूल कसा वाढू शकेल. शहरात जनहिताच्या वेगवेगळ्या योजना कशाप्रकारे राबवता येतील या आणि अशा अनेक विषयांशी संबंधित असे हे ठराव आहेत. मात्र, त्याबाबतचे अभिप्राय आजवर देण्यात आलेले नाहीत.
अभिप्रायावर मागवला अभिप्राय
प्रशासनाला जे विषय अडचणीचे ठरतात, अशा ठरावांवर अभिप्राय दिले जात नाहीत. ही परिस्थिती लक्षात घेऊन यापुढे किती दिवसात प्रशासनाकडून अभिप्राय आला पाहिजे तो कालावधी निश्चित करावा व मगच ठराव अभिप्रायासाठी पाठवावा. तसेच दिलेल्या मुदतीत अभिप्राय आला नाही, तर तोच ठराव नगरसचिवांनी पुन्हा स्थायी समितीच्या कार्यपत्रिकेवर मांडावा, असा ठराव बागूल यांनी दिला आहे. हा ठराव स्थायी समितीमध्ये आल्यानंतर त्याच्यावरही अभिप्राय घ्यावा, असा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. त्यामुळे त्या ठरावावर प्रशासन केव्हा अभिप्राय देणार असा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.