पुणे : राज्यातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील शून्य फेरीमध्ये राखीव कोट्याअंतर्गत ६० हजार ४८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. आता विद्यार्थी, पालकांना केंद्रीभूत पहिल्या फेरीचे (कॅप) वेध लागले आहेत.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी ही माहिती दिली. यंदा पहिल्यांदाच राज्यातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन प्रवेश पद्धतीने राबवण्यात येत आहे. त्यानुसार जाहीर करण्यात आलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार शून्य फेरीत राखीव कोट्याची प्रवेश प्रक्रिया गुरुवारी (१२ जून) सुरू करण्यात आली. तर प्रवेशाची अंतिम मुदत शनिवारपर्यंत (१४ जून) होती. कोट्यातून प्रवेशासाठी राज्यभरातील एकूण १ लाख १३ हजार ४८ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी एकूण ६० हजार ४८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. गुरुवारी ९ हजार ८७, शुक्रवारी २४ हजार ६२९, तर शनिवारी २६ हजार ७७१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
इनहाऊस कोट्याअंतर्गत अर्ज केलेल्या ५२ हजार ४६८ विद्यार्थ्यांपैकी २६ हजार ५२१, व्यवस्थापन कोट्याअंतर्गत अर्ज केलेल्या ३६ हजार ९९१ विद्यार्थ्यांपैकी ७ हजार ७५६, तर अल्पसंख्यांक कोट्याअंतर्गत ३६ हजार ९९१ विद्यार्थ्यांपैकी २६ हजार २१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. कोट्याद्वारे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश फेऱ्यांतून वगळण्यात येणार आहे, असे नमूद करण्यात आले. प्रवेश प्रक्रियेत जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या फेरीच्या वेळापत्रकानुसार १७ जून रोजी गुणवत्ता यादीच्या आधारे विद्यार्थी, कनिष्ठ महाविद्यालय वाटप, निवड प्रक्रिया राबवून विभागीय समितीद्वारे परीक्षण करण्यात येणार आहे. तर २६ जून रोजी कनिष्ठ महाविद्यालयनिहाय विद्यार्थी वाटप यादी जाहीर करण्यात येणार आहे.