लष्करी जवानाच्या कुटुंबीयांना ६२ लाखांची नुकसानभरपाई | Loksatta

लष्करी जवानाच्या कुटुंबीयांना ६२ लाखांची नुकसानभरपाई

खणकर यांची लवकरच पदोन्नती होणार होती. मृत्युसमयी त्यांचा पगार चौतीस हजार रुपये होता.

लष्करी जवानाच्या कुटुंबीयांना ६२ लाखांची नुकसानभरपाई
छायाचित्र प्रातिनिधीक

मोटारीच्या धडकेने अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लष्करी जवानाच्या कु टुंबीयांना बासष्ट लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळणार आहे. तसे आदेश विशेष न्यायाधीश आणि मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे सदस्य एस. जे. काळे यांनी दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयामुळे लष्करी जवानांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. जवानाच्या सेवेचा कालावधी आणि सेवेत मिळणारी पदोन्नती या बाबी विचारात घेऊन न्यायालयाने विमा कंपनीला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

रमेश ठकाराम खणकर (वय ३४, रा. शिरूर) असे अपघाती मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. रमेश हे एक महिन्याच्या सुट्टीवर कुटुंबीयांना भेटण्यासाठी आले होते. ते ४ मार्च २०१४ रोजी दुचाकीवरून पुणे-नगर रस्त्याने निघाले होते. त्या वेळी मोटारीने त्यांना धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या खणकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल क रण्यात आले होते. उपचारांपूर्वीच ते मरण पावले होते. रमेश यांच्या पश्चात पत्नी, पाच वर्षांचा मुलगा, दोन वर्षांची मुलगी, आई-वडील असा परिवार आहे.

खणकर कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून मोटार चालक आणि विमा कंपनी असलेल्या युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात अ‍ॅड. देवराम झंझाड, अ‍ॅड. हेमंत झंझाड, अ‍ॅड. नितीन झंझाड यांनी मोटार अपघात न्यायप्राधिकरणात दावा दाखल केला होता. अपघातात मृत्यू झालेल्या खणकर यांचे वय पाहता त्यांचा तरुण वयात मृत्यू झाला होता. त्यांच्यावर कुटुंबीयांची भिस्त होती. खणकर यांची लवकरच पदोन्नती होणार होती. मृत्युसमयी त्यांचा पगार चौतीस हजार रुपये होता. लष्कराच्या सेवानियमानुसार त्यांची आणखी दहा ते बारा वर्षांची सेवा बाकी होती. तत्पूर्वी त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे खणकर कुटुंबीयांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी, अशी विनंती मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे सदस्य एस. जे. काळे यांच्याकडे करण्यात आली होती. हे प्रकरण न्यायप्राधिकरणासमोर तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि कंपनीचे वकील तेथे उपस्थित होते. दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविण्यात आल्यानंतर खणकर कुटुंबीयांना बासष्ट लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2016 at 02:15 IST
Next Story
स्थानिकांचे पारडे जड राहणार का?