scorecardresearch

कसब्यात विजयासाठी ६५ हजारांचा जादुई आकडा

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढल्याने निवडणुकीत विजयी होण्यासाठी किमान ६५ हजारांहून अधिक मतांची आवश्यकता असल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

votes required kasba
कसब्यात विजयासाठी ६५ हजारांचा जादुई आकडा (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढल्याने निवडणुकीत विजयी होण्यासाठी किमान ६५ हजारांहून अधिक मतांची आवश्यकता असल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे ६५ हजारांहून जास्त मते घेणाऱ्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ पडण्याची शक्यता आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणूक चुरशीची झाली आहे. पोटनिवडणूक असूनही ५०.०६ टक्के मतदान झाल्याने कसब्यातून कोण निवडून येणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ७५ हजार ५८ मतदार असून त्यापैकी १ लाख ३८ हजार १७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी एकूण १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, पोटनिवडणूक भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर अशी सरळ लढत झाल्याने अन्य उमेदवारांना मतदान होण्याची शक्यता कमी आहे. उर्वरित अपक्ष मतदारांना एकूण दहा हजारांच्या आसपास मतदान होईल, असे गृहीत धरले तरी हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये उर्वरित १ लाख २८ हजार १७५ मतांची विभागणी होणार आहे. त्यामुळे निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर यांना किमान ६५ हजारांहून अधिक मते मिळवावी लागणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – निकालापूर्वीच पिंपरी-चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांचे आमदार म्हणून झळकले फ्लेक्स

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पेठ भागात सर्वाधिक मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पूर्व भागात पेठांच्या तुलनेत कमी मतदान झाल्याने सदाशिव, नारायण, शनिवार आणि कसबा पेठांतील मतदान पोटनिवडणुकीतील विजयात निर्णायक ठरणार आहे. शनिवार पेठ-सदाशिव पेठ या प्रभाग क्रमांक पंधरा आणि नवी पेठ-पर्वती या प्रभाग क्रमांक २९ या प्रभागातून मताधिक्यावर भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांची भिस्त आहे. तर शिवाजी रस्ता ते नेहरू रस्ता यामधील रविवार पेठ, गणेश पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, घोरपडे पेठांमध्ये, तसेच मुस्लीम आणि दलित वस्ती असलेल्या भागातील मताधिक्यावर काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांची भिस्त असेल. भाजपा आणि काँग्रेसच्या हक्काच्या मतदारसंघात प्रतिस्पर्धी उमेदवार किती मताधिक्य घेतात, यावरही विजयाचे गणित निश्चित होणार आहे.

हेही वाचा – खडकवासला धरणातून शेतीसाठी आजपासून पाणी सोडण्यास सुरुवात

ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी कसबा पेठत ५१.६ टक्के मतदान झाले होते. कसब्याच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना ७५ हजार ४९२ मते मिळाली होती. तर काँग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे यांना ४७ हजार २९६ मते मिळाली होती. मुक्ता टिळक २८ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांना शनिवार पेठ-सदाशिव पेठ या प्रभागातून १८ हजारांचे आणि नवी पेठ-पर्वती प्रभागातून ५ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या मतदानाची टक्केवारी पाहाता पोटनिवडणुकीत सहा प्रभागांपैकी पाच प्रभागांमधील मतदानाच्या टक्केवारीमध्ये जास्त बदल झालेला नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मात्र शनिवार पेठ-सदाशिव पेठ या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये ऑक्टोबरच्या तुलनेत पाच टक्के कमी मतदान झाल्याचेही दिसून येत आहे. उर्वरित प्रभागात दीड टक्क्यांपर्यंत मतदान कमी झाले आहे. त्यामुळे पेठातून सर्वाधिक मताधिक्य घेणारा उमेदवार विजयाच्या समीप जाणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 11:08 IST