शहरातील ६६ जणांची फसवणूक; महारयत अ‍ॅग्रो कंपनी विरोधात गुन्हा

पुणे : कडकनाथ कोंबडी पालनात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून राज्यातील अनेकांची फसवणूक करण्यात आल्याचे प्रकरण उजेडात आले असताना शहरातील ६६ जणांना पावणेदोन कोटी रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महारयत अ‍ॅग्रो इंडिया प्रा. लि. तसेच रयत अ‍ॅग्रो इंडिया या कंपनीच्या संस्थापक, संचालक, लेखापाला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी प्रीतम माने याला अटक करण्यात आली असून कंपनीचे अध्यक्ष सुधीर शंकर मोहिते, संचालक संदीप सुभाष मोहिते (दोघे रा. इस्लामपूर, जि. सांगली) यांच्यासह हनुमंत शंकर जगदाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नीलेश शिवाजी आंबेडे (वय ३५,रा. धनलक्ष्मी सोसायटी, दत्तवाडी) यांनी यासंदर्भात दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडकनाथ कोंबडी पालनाच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे आमिष महारयत अ‍ॅग्रो कंपनीकडून दाखविण्यात आले होते. तक्रारदाराकडून अडीच लाख रूपये स्वीकारण्यात आले होते. रक्कम स्वीकारल्याची पावती तक्रारदाराला देण्यात आली होती. करारानुसार अटी आणि शर्थीचे पालन कंपनीकडून करण्यात आले नाही. त्यामुळे अंबोडे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. दरम्यान, महारयत अ‍ॅग्रो इंडिया कंपनीकडून अंबोडे यांच्यासह ६६ जणांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले. अंबोडे तसेच अन्य तक्रारदारांकडून १ कोटी ७३ लाख १९ हजार रुपये घेण्यात आले होते. फसवणूक प्रकरणी नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर कंपनीतील लेखापाल प्रीतम मानेला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक शंकर सलगर तपास करत आहेत.