काँग्रेस कार्यकर्ते गोंधळे यांच्या खून प्रकरणी सात जण अटकेत

पूर्ववैमनस्यातून काँग्रेसचे कार्यकर्ते प्रकाश नारायण गोंधळे (वय ४६, रा. गोंधळेनगर, हडपसर) यांचा धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला.

पूर्ववैमनस्यातून काँग्रेसचे कार्यकर्ते प्रकाश नारायण गोंधळे (वय ४६, रा. गोंधळेनगर, हडपसर) यांचा धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला. सोमवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास गोंधळेनगर येथे ही घटना घडली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी सात जणांस अटक केली.
विक्रांत भालचंद्र जाधव, अक्षय इंगुळकर, वैभव ज्योतीराम भाडळे, आकाश विठ्ठल शिंदे, अमोल दत्तू शेडगे, सूरज मारुती काळेआणि श्रीकांत विश्वास आटोळे (रा. सर्व जण-गोंधळेनगर, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी गोंधळे यांचे मित्र राजेंद्र देविदास पिंगळे (वय ४४, रा. शनि मंदिर गोंधळेनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंधळे व आरोपींची पंधरा दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडणे झाले होती. या वेळी गोंधळे यांच्या घरावर आरोपींनी हल्ला केला होता. तर गोंधळे यांच्या कार्यकर्त्यांनी आरोपीपैकी एकाच्या घरात घुसून तोडफोड केली होती. त्या वेळी त्यांनी एकमेकांच्या विरुद्ध तक्रारी दाखल केल्या होत्या. गोंधळे हे त्यांचे मित्र पिंगळे यांच्या सोबत मोटारसायकलवरून सोमवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास घरी जात होते. त्या वेळी मोटारसायकलवरून आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर गोंधळेनगर येथे धारदार शस्त्रांनी वार केले. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. पंधरा दिवसांपूर्वी पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी हा खून केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांस रात्री उशिरा अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव हे करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 7 arrested in murder of congress activist prakash gondhale