दारूच्या नशेतील एका व्यावसायिकाने एका भरधाव मोटार चालवित डेक्कन जिमखाना बसस्थानकाजवळ चार दुचाकी, एक रिक्षा, पाणीपुरी गाडी यांना उडविले. यामध्ये रिक्षातील दोघे, दुचाकीवरील एक तरुण आणि तरुणी आणि पाणीपुरीवाला, तीन दुचाकीवरील असे एकूण सहा जण जखमी आहेत. जखमींमध्ये एका तरुणीची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. त्यानंतर चालक पळून जाताना नागरिक आणि वाहतूक पोलिसांनी त्याला पकडले.
महेश मारुती सरदेसाई (वय ३८, रा. साई व्हिला, नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क) असे अटक केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. या घटनेत रिक्षाचालक राम धोंडिबा गाडेकर (रा. निगडी), प्रवाशी महेश वरवटे, शाईन दुचाकी चालक शरद चंद्रकांत शेंडेकर, श्रेयस जर्नादन आशिष (रा. सुस रस्ता, पाषाण), महेश दिगंबर बिराजदार (रा. पुलाची वाडी), विद्यार्थी अभिमन्यू विनायक तांबे आणि स्वप्नाली महाडिक हे जखमी आहे. यातील स्वप्नाली हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरदेसाई हा होंडा सिटी मोटारीतून सायंकाळी पावणेपाच वाजता दारूच्या नशेत जंगली महाराज रस्त्याने जात होता. डेक्कन जिमखाना बस स्थानकाजवळ त्याचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. त्याने बसस्थानकाच्या जवळून नदी पात्राकडे जाणाऱ्या एका दुचाकीला ठोकर दिली. या दुचाकीवर अभिमन्यू हा विद्यार्थी होता. त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका रिक्षाला मोटारीने जोरात धकड दिली. त्यानंतर दुचाकी, पाणीपुरीची गाडी, उभ्या दुचाकी या सर्वाना फरफटत घेऊन येथील रसवंतीगृहात घुसली. मोटारीचा वेग एवढा होता, की तीनचार दुचाकी, एक रिक्षा आणि पाणीपुरीगाडी या सर्वाना घेऊन मोटार फुटपाथवर गेली.
अपघातानंतर सरदेसाई मोटारीतून उतरून खंडोजीबाबा चौकाकडे जात होता. त्याला नागरिक पकडून चोप दिला. या अपघातातील जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा मोटार चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत डेक्कन पोलीस ठाण्यात सुरू होते. या अपघातानंतर डेक्कन परिसरातील वाहतुकीची काही वेळ कोंडी झाली होती. सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र साळुंखे, पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ भापकर आणि डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत केली.
 सरदेसाईच्या मोटारीत दारूच्या बाटल्या
सरदेसाई हा व्यावसायिक असून त्याचा कोरेगाव पार्क येथे बंगला आहे. त्याचा वडगाव शेरी येथे स्पेअरपार्ट बनविण्याचा कारखाना आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकीमध्ये तो हसत होता. पोलिसांना त्याच्या मोटारीत दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. त्याला पळून जाताना नागरिक आणि वाहतूक पोलिसांनी पकडले, अशी माहिती डेक्कन पोलिसांनी दिली.