मावळ येथील धामणे गावात आज पहाटेच्या सुमारास सशस्र दरोडखोरांनी आई, वडील आणि मुलाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. याच कुटुंबातील सून आणि नातू गंभीर जखमी आहेत. या घटनेने परिसरात दरोडखोरांच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात गेल्या पंचवीस दिवसांत सात हत्या झाल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत केवळ एकाच घटनेतील आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. तर इतर आरोपींना शोधण्यात पोलिसांना अपयश आले आहे. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुंबई पुणे जुन्या महामार्गालगत असलेल्या धामणे गावात आज पहाटे एक धक्कदायक घटना घडली. दरोडेखोराच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या कुटुंबातील तिघांची टिकावाने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. नथु विठोबा फाले, छबाबाई विठोबा फाले आणि मुलगा आक्रीनंदन उर्फ आबा विठोबा फाले या तिघांचा दरोडखोरांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. हे शेतकरी कुटुंब आहे अशी माहिती समोर येत आहे. तसेच घटनेते नथू फाले यांची सून व नातू गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मावळ परिसरात गेल्या पंचवीस दिवसात सात हत्या झाल्या आहेत.

*एप्रिल महिन्यातील मावळ आणि लोणावळा परिसरातील हत्या-
या महिन्याच्या सुरुवातीला ३ एप्रिलला लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयातील विद्य़ार्थी आणि विद्यार्थिनीची निर्घृण हत्या झाल्याचा प्रकार घडला होता. यामध्ये श्रुती डुंबरे (२१) आणि सार्थक दिलीप वाघचौरे (२२) या दोन विद्यार्थांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह हे विवस्त्र अवस्थेत आढळले होते. अज्ञाताविरोधात लोणावळा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप ग्रामीण पोलिसांच्या हाती आरोपीविषयी कोणतेही धागेदोरे लागलेले नाहीत.

[jwplayer kiIy8yVZ]

२० एप्रिलला तळेगाव दाभाडे येथील घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याला एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली होती. या घटनेत महिलेचा गळा आवळून खून केला असल्याचे निष्पन्न झाले होते. हत्येनंतर तीन दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आला.

२३ एप्रिलला सांगवडे येथील महिला सरपंचच्या पतीची हत्या झाली होती. मावळ तालुक्यातील सांगवडे गावात नवनाथ लिमण (३२) याला लाकडी दांडक्याने मारहाण करत तलवारीचे वार करुन त्याची हत्या करण्यात आली. ही हत्या राजकीय वादातून झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. या घटनेत आरोपीला ताब्यात घेण्यात आलं होत. मात्र मुख्य आरोपी फरार आहे.

या सर्व घटना एप्रिल महिन्यातील असून, गेल्या २५ दिवसांत घडल्या आहेत हे विशेष. यापैकी सांगवडे येथील हत्येत एकाला अटक करण्यात आली असली तरी या हत्येतील मुख्य आरोपी फरार आहे. तर अन्य हत्येतील आरोपींपर्यंत अद्याप पुणे ग्रामीण पोलीस पोहोचू शकलेले नाहीत. त्यामुळं पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

[jwplayer XA2jiImS]