अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. देशमुख यांनी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. जानेवारी २००९ मध्ये ही घटना घडली.
जितू उर्फ जितेंद्र रामचंद्र साळुंके (वय २४, मूळ रा. कुऱ्हाडेवाडी, ता. भुसावळ, जि. जळगाव. सध्या रा. भोसरी) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी भोसरी येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सहावीत शिकत होती. ती शाळेत गेली असताना एका अल्पवयीन आरोपीने तिची बहीण आजारी असल्याचे सांगून तिला शाळेतून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पीडित मुलगी त्याच्यासोबत गेली नाही. परंतु, शाळा सुटल्यावर तीन अल्पवयीन आरोपींनी तिला सुमो गाडीतून मरकळ येथे आरोपी जितू साळुंके याच्या घरी नेले. पीडित मुलीच्याच ओळखीच्या एका आरोपीने तिला लग्नाची मागणी घातली. त्यास नकार दिल्यामुळे आरोपींनी तिला मारहाण केली. दुसऱ्या दिवशी साळुंके आणि अन्य तीन आरोपींनी तिला साळुंके यांच्या मूळगावी नेले. त्या ठिकाणी साळुंके आणि एका अल्पवयीन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने तिच्या आईला फोनवरून सांगितल्यानंतर मरकळ येथून तिच्या आईने तिची सुटका केली. या गुन्ह्य़ात एकजण फरार असून अल्पवयीन दोघांची बालसुधारगृहात रवानगी केली असून त्यांच्यावर बालन्यायालयात सुनावणी सुरू आहे. या खटल्यात सरकारी वकील विजय घोगरे यांनी सात जणांची साक्षीदार तपासले.