पुणे : कोंढव्यातील मीठानगरमध्ये राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कारवाई केलेल्या बनावट दूरध्वनी केंद्रात परदेशातून आलेले दूरध्वनी स्थानिक दूरध्वनीवर पाठविण्यासाठी सहा हजार ८२० सीम कार्ड पुरविण्यात आल्याची धक्कादायक माहिती एटीएसने केलेल्या तपासात उघडकीस आली आहे. एटीएसकडून सोमवारी याप्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवड होणार खड्डेमुक्त; वाचा महापालिकेने काय घेतला निर्णय

या प्रकरणी नौशाद अहमद सिद्धिकी ऊर्फ कुमार (वय ३२, रा. कोंढवा), महम्मद उजैर शौकत अली अन्सारी ऊर्फ सोनू (वय २९ भिवंडी), पियुष सुभाषराव गजभिये (वय २९, रा. वर्धा) यांना नुकतीच अटक करण्यात आली. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणात एटीएसने अब्दुल कासीम सिद्दीकी ऊर्फ रेहान (वय ३४, रा. भिवंडी), प्रवीण गोपाळ श्रीवास्तव (रा. उत्तर प्रदेश) यांना सोमवारी अटक केली आहे. नाैशाद, पियुष, सोनू यांच्यासह रेहान आणि श्रीवास्तव यांना १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. रेहानने नौशाद, पियुष, सोनू यांना बनावट दूरध्वनी केंद्र कसे चालवायचे, याबाबतचे प्रशिक्षण दिले आहे.

हेही वाचा >>> पिंपरी : ‘लेझर बीम’चा वापर टाळा; पोलीस आयुक्तांचे आवाहन

आरोपी भिवंडी येथे बनावट दूरध्वनी केंद्र चालवायचे. रेहानने नौशाद, पियुष, सोनू यांना काेंढव्यात नेले. तेथे त्यांनी बनावट दूरध्वनी केंद्र सुरू केले. रेहानने तिघांना बँक खाते उघडून दिले होते. एटीएसने कोंढव्यात केलेल्या कारवाईत तीन हजार ७८८ सीम कार्ड सापडली. आरोपींनी ७७ सीम कार्ड कोंढव्यातील भंडारी पूल येथे फेकून दिले होते. फेकून देण्यात आलेल्या सीमकार्डचा शोध घेण्यात आला आहे. श्रीवास्तवने आरोपींना सहा हजार ८०० सीम दिले आहेत. सीम कार्ड त्याने कोठून आणले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. त्यापैकी ६२ सीमकार्डची नोंदणी उत्तर प्रदेशात झाल्याचे उघडकीस आले असून, तपासासाठी आरोपींना उत्तर प्रदेशला घेऊन जायचे असल्याची माहिती एटीएसने न्यायालयात दिली.