scorecardresearch

पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी नोंदणीत यंदा वाढ; ८ लाख ९९ हजार ९२१ विद्यार्थ्यांची नोंदणी

शिष्यवृत्ती परीक्षा ही शालेय जीवनातील पहिली स्पर्धा परीक्षा असते. पूर्वी चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जात होती.

पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी नोंदणीत यंदा वाढ; ८ लाख ९९ हजार ९२१ विद्यार्थ्यांची नोंदणी
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

पुणे : राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी वाढली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत पाचवी आणि आठवीचे दीड लाखांहून अधिक विद्यार्थी वाढले असून, १२ फेब्रुवारीला परीक्षा होणार आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा ही शालेय जीवनातील पहिली स्पर्धा परीक्षा असते. पूर्वी चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जात होती. मात्र त्यात बदल करून आता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते. गेल्या काही वर्षांत शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचे निदर्शनास येत होते. त्यामुळे विद्यार्थिसंख्या वाढवण्यासाठी शिक्षण विभागाकडून राज्यभरात प्रयत्न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. आता पुन्हा विद्यार्थिसंख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे.

यंदा पाचवी आणि आठवीच्या मिळून ८ लाख ९९ हजार ९२१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. २०२१ मध्ये पाचवीच्या ३ लाख ८८ हजार ५१२ विद्यार्थ्यांनी, आठवीच्या २ लाख ४४ हजार ३११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्यावर्षी २०२२ मध्ये पाचवीच्या ४ लाख १८ हजार ५३, आठवीच्या ३ लाख ३ हजार ८१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर यंदा पाचवीच्या ५ लाख ३२ हजार ४९३ आणि आठवीच्या ३ लाख ६७ हजार ४२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती परीक्षा परिषदेने दिली.

पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थिसंख्येत वाढ होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले होते. त्यासाठी शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्यासह बैठका घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचा पाया घातला जात असल्याने ही परीक्षा महत्त्वाची आहे. याबाबतची जागृती पालक आणि शिक्षकांमध्ये झाल्याने विद्यार्थिसंख्या वाढलेली आहे.

– शैलजा दराडे, आयुक्त, परीक्षा परिषद

 शालेय परीक्षेच्या वातावरणापेक्षा शिष्यवृत्ती परीक्षा ही वेगळय़ा वातावरणात होते. तसेच या परीक्षेतील प्रश्नपत्रिका बहुपर्यायी स्वरुपाची असल्याने हे स्वरुप विद्यार्थ्यांसाठी वेगळे असते. शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांची पहिली स्पर्धा परीक्षा असते. शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढणे हे सुचिन्ह आहे. आता वाढलेली विद्यार्थिसंख्या टिकवणे आणि त्यात अधिक वाढ करणे महत्त्वाचे आहे. 

– डॉ. वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 06:32 IST

संबंधित बातम्या