पुणे : सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे सत्र कायम आहे. चोरट्यांनी वेगवेगळी आमिषे दाखवून सहा जणांची ७९ लाख १८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विमानतळ, कोंढवा, कोथरुड पोलीस ठाण्यात फसवणूक, तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. शेअर बाजारात गुंतवणूक मार्गदर्शन करम्याच्या आमिषाने एकाची ३० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चोरट्यांनी तक्रारदारच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करण्याचे आमिष दाखविले. चोरट्याने गुंतवणुकीच्या आमिषाने बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. चोरट्याने तक्रारदाराकडून वेळोवेळी ३० लाख रुपये बँक खात्यात जमा करून घेतले. तक्रारदाराला परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार तपास करत आहेत. हेही वाचा >>>स्वप्नील कुसळेचे पुण्यात जंगी स्वागत, बाप्पाची आरती आणि ढोल ताशाच्या गजरात काढली मिरवणूक शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने कोथरूड भागातील एकाची २० लाख १८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत एकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोथरुड परिसरातील आणखी एकाची अशाच पद्धतीने १८ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. तक्रारदार खासगी कंपनीत नोकरी करतात. कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने तपास करत आहेत. ऑनलाइन पद्धतीने घरातून काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून विश्रांतवाडी भागातील एका तरुणाची तीन लाख ६१ हजार ८०० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत तरुणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हेही वाचा >>>बाॅलीवूडमधील फॅशन डिझायनर निवेदिता साबू यांच्या वस्त्रदालनात चोरी; कल्याणीनगरमधील वस्त्रदालनातून रोकड, महागडे शर्ट लंपास ज्येष्ठाची फसवणूक गॅस बिल थकीत असल्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाची चार लाख ९४ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत कोंढव्यातील उंड्री भागात राहणाऱ्या ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे. ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी संपर्क साधला. गॅस बिल थकीत असल्याची बतावणी केली. चोरट्यांनी बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन खात्यातून ऑनलाइन पद्धतीने पैसे चोरले. पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.