जिल्ह्यात संपूर्ण जुलै आणि ऑगस्टच्या पहिल्या दहा दिवसांत मुसळधार पाऊस पडला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील ८३७० शेतकरी बाधित झाले असून संबंधितांच्या २०६८.८६ हेक्टर क्षेत्रावरील पिके, फळबागांचे नुकसान झाले आहे. शेती असलेले ११.३५ हेक्टर क्षेत्र पावसाच्या पाण्यात वाहून गेले आहे. याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. दोन कोटी ४५ लाख २९७ रुपयांच्या निधीची मागणी नुकसानभरपाई म्हणून करण्यात आली आहे.

मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर संपूर्ण जून महिन्यात जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जुलैअखेरीस विश्रांती घेतलेल्या पावसाने ऑगस्टच्या सुरुवातीपासून पुन्हा पुनरागमन केले. या पावसात जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या घरांची पडझड झाली असून तीन व्यक्तींचा पावसामुळे जीव गेला आहे, तर दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडून तालुका स्तरानुसार नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून दोन कोटी ४५ लाख २९७ रुपयांच्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.
जिल्ह्यात जून महिन्यात ४७.२ टक्के, तर जुलै महिन्यात तब्बल १०८ टक्के पावसाची नोंद करण्यात आली. यामध्ये खेड तालुक्यात सर्वाधिक २०२ टक्के पाऊस झाला आहे. शहरालगत असणाऱ्या हवेली तालुक्यात सर्वात कमी ९७ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. जोरदार पावसामुळे ११.३५ हेक्टर क्षेत्रावर दरड कोसळणे, शेतातील माती वाहून जाण्याचे प्रकार घडले आहेत. १४ तालुक्यांपैकी दहा तालुक्यात २८१ गावांमध्ये २०६८.८६ हेक्टर क्षेत्रावरील खरिपाची पिके, फळबागांना पावसाचा फटका बसला आहे. यामध्ये २०१७.४१ हेक्टर क्षेत्रावरील जिरायती, १५.३० हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे ८३७० शेतकरी बाधित झाले आहेत. गाय, म्हैस, बैल, घोडे, उंट, शेळ्या, मेंढ्या, वासरे आदी २६५ जनावरे इतर पशुधन मृत झाले आहेत, तर ४७६ कच्च्या पक्क्या घरांची पडझड होऊन अंशतः नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. पशुधन बाधित असून घरांची पडझड होऊन तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून संबंधित अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांप्रमाणे मदतनिधीचे वाटप करण्यात आले आहे, तर शेत पिकांच्या नुकसानीसंदर्भात राज्य शासनाकडून निधी प्राप्त होताच, नुकसानग्रस्तांना मदत देण्यात येईल. – हिम्मत खराडे, निवासी उपजिल्हाधिकारी