पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्याची प्रारूप मतदारयादी मंगळवारी (६ ऑगस्ट) प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत तब्बल २०४ मतदान केंद्रांची नव्याने भर पडली असल्याने जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण ८४१७ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. ही संख्या राज्यात सर्वाधिक असल्याने मतदान केंद्रांमध्ये पुणे हे अव्वलस्थानी पोहोचले आहे. पुण्याखालोखाल मुंबई उपनगर, ठाणे आणि नागपूर जिल्ह्यात मतदान केंद्रे आहेत. हेही वाचा >>> लोकसभा निवडणुकीनंतर पुण्यात किती मतदार वाढले? पुणे जिल्ह्यात २१ विधानसभा मतदारसंघ आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या मतदार संघांची प्रारूप मतदारयादी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मंगळवारी प्रसिद्ध केली. या प्रारूप मतदार यादीत जिल्ह्यात ८४१७ मतदान केंद्रांवर एकूण ८४ लाख ३९ हजार ७२९ मतदार असून त्यापैकी ४४ लाख तीन हजार ३४४ पुरुष, ४० लाख ३५ हजार ६४० महिला आणि ७४५ तृतीयपंथीय मतदार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान केंद्रांची संख्या ही ८२१३ होती. विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक मतदान केंद्रे असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी स्पष्ट केले. हेही वाचा >>> पुणेकरांनो, आता खड्ड्यांच्या तक्रारींचा ‘पाऊस’ पाडा! तक्रार करण्यासाठी महापालिकेची विशेष व्यवस्था; १२२४ खड्ड्यांची दुरुस्ती विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर, ठाणे, नागपूर या जिल्ह्यांतील मतदान केंद्रांची संख्या वाढली, तरी पुणे जिल्ह्यापेक्षा जास्त मतदान केंद्रे होण्याची शक्यता फारच कमी आहे. परिणामी पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मतदान केंद्रे असतील, असेही कळसकर यांनी सांगितले. प्रमुख जिल्ह्यांमधील मतदान केंद्रे मुंबई उपनगर - ७३८० ठाणे - ६५९२ नाशिक - ४८०० नागपूर -४५१० नगर - ३७३४ सोलापूर - ३६१७ जळगाव - ३५८२ कोल्हापूर - ३३६८ छत्रपती संभाजीनगर - ३०८५ नांदेड - ३०४७ सातारा - ३०२५ सिंधुदुर्ग - ९१८ गडचिरोली - ९५०