पुणे : आगामी महापालिका निवडणुकीनंतर महापालिकेच्या सभागृहात ८७ नगरसेविका निश्चितपणे प्रवेश करतील. त्यामुळे नगरसेवकांच्या संख्येपेक्षा नगरसेविकांची संख्या अधिक होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पन्नास टक्के आरक्षणानुसार पुण्यात १७३ पैकी नगरसेविकांसाठी ८७ जागा राखीव असतील. याशिवाय खुल्या गटातूनही महिला उभ्या राहू शकणार असल्याने नगरसेविकांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे.

पन्नास टक्के आरक्षणानुसार महापालिकेच्या नव्या सभागृहात ८७ नगरसेविका निश्चित झाल्या आहेत. महापालिकेच्या पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात अपेक्षित असलेल्या निवडणुकीसाठी ५८ प्रभाग होणार असून नगरसेवकांची संख्या १७३ होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे. आगामी निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आरक्षणासह पन्नास टक्के महिला आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे.

राज्यातील महापालिकांमधील नगरसेवकांची संख्या पंधरा टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आगामी महापालिका निवडणुकीत शहरातील नगरसेवकांची संख्या नऊने वाढणार आहे. आगामी निवडणुकीनंतर महिलांची सभागृहातील संख्या वाढणार आहे.

१७३ नगरसेवकांसाठी ५८ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. यातील एका प्रभागात दोन नगरसेवक असतील. पन्नास टक्के आरक्षणानुसार ८७ जागा महिलांसाठी राखीव असतील. पन्नास टक्के आरक्षणानुसार महिलांसाठीच्या ८७ राखीव जागांपैकी अनुसूचित जातींसाठी १२ जागा, अनुसूचित जमातींसाठी एक जागा, ओबीसी आरक्षणानुसार चोवीस जागा आणि सर्वसाधारण किंवा खुल्या गटातील महिलांसाठी ५० जागा निश्चित आहेत. सर्वसाधारण गटासाठी एकूण ५१ जागा असून त्यामध्येही महिलांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

सध्याची रचना

राज्य निवडणूक आयोगाने शहराची लोकसंख्या ३५ लाख ५६ हजार ८२४ एवढी निश्चित केली आहे. यामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या ४८ हजार १७ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ४१ हजार ५६१ एवढी आहे. महापालिकेची सन २०१७ मधील निवडणूक चार नगरसेवकांचा एक प्रभाग या पद्धतीने झाली. सध्या शहरात ४१ प्रभाग असून समाविष्ट अकरा गावांसाठी एक असे एकूण ४२ प्रभाग आहेत. यातील दोन प्रभाग तीन नगरसेवकांचे आहेत. ४१ प्रभागांसाठी १६२ नगरसेवक असून समाविष्ट अकरा गावांसाठी २ नगरसेवक असे एकूण १६४ नगरसेवक आहेत.

एक प्रभाग ५५ ते ६० हजार लोकसंख्येचा तीन नगरसेवकांचा एक प्रभाग या पद्धतीने निवडणूक होणार असल्याने एक प्रभाग जास्तीत जास्त ५५ ते ६० हजार लोकसंख्येचा होण्याची शक्यता आहे. सध्या चार नगरसेवकांचा एक प्रभाग असल्याने प्रभागातील लोकसंख्या ७० ते ७५ हजार एवढी आहे. प्रभाग रचना करताना लोकसंख्येत पंधरा टक्के वाढ गृहीत धरण्यात आली आहे.

शहरीकरणाबरोबरच राजकारणात महिलांचा सहभाग वाढतो आहे, ही बाब स्वागतार्ह आहे. सुशिक्षित महिला राजकारणात येत आहेत. स्त्रियांचे प्रश्न, आरोग्याच्या समस्या, सुरक्षितता याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महिलांच्या वाढत्या संख्येने प्रश्न सुटण्यास मदत होईल.

– डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधानपरिषद

पन्नास टक्के महिला आरक्षणामुळे नगरसेविकांची संख्या निश्चितच वाढेल. यामुळे चांगले काम करणाऱ्या महिलांना मोठी संधी मिळणार आहे. कामाचा ध्यास आणि कार्यपद्धती यामुळे महिलांना पुढे जाण्याची संधी आहे. िलग समानतेच्या दृष्टीनेही ही बाब उपयुक्त ठरणार आहे.

– अ‍ॅड. वंदना चव्हाण, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस</strong>