scorecardresearch

पिंपरीत ८९ उमेदवार गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे

१०वी पर्यंत शिकलेले २६० उमेदवार आहेत. तर दहा उमेदवार पूर्णपणे निरक्षर असल्याचे सांगण्यात आले.

rod, delhi, delhi school
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पिंपरी पालिकेच्या निवडणूक रिंगणात ८९ उमेदवार गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे असून, त्यांच्यावर सर्व मिळून २३७ गुन्हे दाखल आहेत. उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करता एक जण पीएचडीधारक असून, १४७ उमेदवार पदवीधर आहेत आणि दहा जण पूर्णपणे निरक्षर आहेत. शहरातील ८८ केंद्रे व त्यातील ३७३ बूथ संवेदनशील ठरवण्यात आली आहेत.

पिंपरी पालिकेच्या निवडणुका मंगळवारी (२१ फेब्रुवारी) होत असून, त्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, मुख्य निवडणूक अधिकारी यशवंत माने, सहायक आयुक्त अण्णा बोदडे या वेळी उपस्थित होते.

पिंपरी पालिका निवडणुकीत किती गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे उमेदवार आहेत, त्यांच्यावर कशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, याची माहिती दररोज तगादा लावूनही पोलीस तसेच महापालिकेच्या निवडणूक विभागाने पत्रकारांना उपलब्ध करून दिली नाही. शुक्रवारी उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली, तेव्हा पत्रकारांनी गुन्हेगारांविषयी माहिती विचारली. तेव्हाही दोन्हीकडील अधिकाऱ्यांचा नन्नाचा पाढा सुरूच होता. राजकीय दबाव असण्याचा प्रश्न नाही. मात्र, अशा प्रकारची माहिती देता येणार नाही, असाच घोषा त्यांनी लावला होता. पत्रकारांनी लावून धरल्यानंतर त्रोटक स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली. त्यानुसार, ८९ उमेदवार गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे आहेत व त्यांच्यावर २३७ गुन्हे दाखल आहेत. मात्र, ते कोणत्या पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांच्यावर कशा प्रकारचे गुन्हे दाखल आहे, याविषयी माहिती देण्यास असमर्थता व्यक्त करण्यात आली. गुन्हेगारी पाश्र्वभूमी असणाऱ्या उमेदवारांची माहिती मतदानाच्या दिवशी केंद्राबाहेर लावण्यात येणार आहे. त्यामध्ये संपत्तीचा गोषवाराही असेल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. या संदर्भात प्रश्नांची सरबत्ती सुरूच राहिल्याने पत्रकार परिषद गुंडाळण्यात आली.

तत्पूर्वी, पालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची शैक्षणिक अर्हता पालिकेने जाहीर केली. एक उमेदवार पीएचडी, १४७ उमेदवार पदवीधारक, १०५ पदविकाधारक, १२वी झालेले १५० उमेदवार, दहावी झालेले १३५ उमेदवार आहेत.

१०वी पर्यंत शिकलेले २६० उमेदवार आहेत. तर दहा उमेदवार पूर्णपणे निरक्षर असल्याचे सांगण्यात आले. पालिकेची एक जागा बिनविरोध झाली असल्याने १२७ जागांसाठी निवडणूक रिंगणात ६७३ उमेदवार रिंगणात आहेत. मतदारसंख्या ११ लाख ९२ हजार इतकी आहे. गेल्या निवडणुकीत सुशिक्षित, महिला व अल्पसंख्याक हे तीन कमी मतदान करणारे घटक निदर्शनास आले होते. यंदा त्यांच्याकडे अधिक लक्ष

देण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

निवडणूक लढवत असलेले..

* १४७ उमेदवार पदवीधारक

* दहा उमेदवार निरक्षर

* मतदारसंख्या ११ लाख ९२ हजार

* १२७ जागांसाठी ६७३ उमेदवार

* शहरात ८८ केंद्रे संवेदनशील

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-02-2017 at 03:24 IST