प्राचीन संस्कृत वाङ्मयात शिकारी पक्ष्यांच्या आलेल्या उल्लेखांपासून आजच्या काळात या डौलदार पक्ष्यांच्या संवर्धनाची असलेली गरज अशा विविध पैलूंवर पक्षी अभ्यासक आणि पक्षिप्रेमींनी चर्चा केली. इला फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आठव्या आंतरराष्ट्रीय शिकारी पक्षी परिषदेचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले.
संस्थेचे संचालक डॉ. सतीश पांडे, पालिका आयुक्त महेश पाठक, शिकारी पक्षी संशोधक रिषाद नौरोजी आणि विविध देशांतील पक्षितज्ज्ञ या वेळी उपस्थित होते.
शिकारी पक्ष्यांची निवासस्थाने वाचवणे त्यांच्या संवर्धनासाठी सर्वाधिक गरजेचे असल्याचे मत नौरोजी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘शिकारी पक्ष्यांचे राहण्याचे ठिकाण खूप मोठय़ा परिसरात पसरलेले असते; तसेच ते खूप मोठय़ा संख्येने आढळत नाहीत. या दोन गोष्टी त्यांच्या संवर्धनात महत्त्वाच्या आहेत. हे पक्षी त्यांच्या निवासस्थानाच्या दृष्टीने खूप संवेदनशील असतात. गवताळ भाग आणि वनांसारखे अधिवास झपाटय़ाने कमी होत असून ते टिकवणे हे शिकारी पक्ष्यांच्या संवर्धनातील महत्त्वाचे पाऊल ठरेल.’’
या वेळी ‘फाल्कनरी इन द लँड ऑफ द ब्लॅकबक’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पांडे म्हणाले, ‘‘आपल्या संस्कृतीत शिकारी पक्ष्यांना मानाचे स्थान असून हे उल्लेख आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडले गेले तर ते स्थानिकांच्याही मनावर नव्याने ठसतील. शाही ससाणा, लगड ससाणा, रक्तलोचन घुबड, शृंगी घुबड, पिंगळा, शिंगळा, तापशी घार, शिक्रा हे शिकारी पक्षी पुण्याच्या आसपास सापडतात. काही पक्षी स्थानिक पातळीवर आढळत असले तरी ते देशपातळीवर दुर्मिळ असू शकतात. वन कायदा आणि वन्य प्राणी संरक्षण कायदा उत्तम आहे; मात्र या कायद्यांची अंमलबजावणी केवळ बडगा दाखवून करता येणार नाही. शिकारी पक्ष्यांची निसर्गातील उपयुक्तता पटवून देता आल्यास त्यांचे संवर्धन अधिक सोपे होईल.’’



