पुणे-नाशिक महामार्गावर थांबलेल्या ट्रकवर एसटी बस आदळून दुर्घटना; सोळा प्रवासी जखमी

पुणे-नाशिक महामार्गावर रस्त्यात थांबलेल्या ट्रकवर एसटी बस आदळून झालेल्या भीषण अपघातात सात एसटी प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. अपघातात ट्रकचालक व त्याच्या सहकाऱ्याचाही मृत्यू झाला. मृतांमध्ये पुण्यातील एका प्रवाशाचा समावेश आहे. अपघातात सोळा प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर पिंपरी, आळेफाटा, नारायणगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातात ट्रकचालक किशोर यशवंत जोंधळे (वय ४०, रा. कोकणगाव, ता. संगमनेर) आणि सहकारी ट्रकचालक रशीद गुलाब पठाण (वय ३०, रा. राजापूर, ता. संगमनेर) यांचा मृत्यू झाला. शोभा नंदू पगार (वय ४५), यमुना भिला पगार (वय ५५, दोघी रा. उतराणे, ता. सटाणा, जि. नाशिक), संकेत दत्तात्रय मिस्त्री (रा. गणेश चौक, सिडको, नाशिक), विकास चंद्रकांत गुजराथी (वय ५०, रा. गंगावेस, ता. सिन्नर), सागर कृष्णालाल चौधरी (वय २७, रा. चाळीसगाव, जि. जळगाव), अभिषेक जोशी (वय २५, रा. साईनाथनगर, वडगाव शेरी, पुणे) आणि संजीवनी कृष्णा घाडगे (रा. सिडको कॉलनी, नाशिक) हे एसटी प्रवासी मृत्युमुखी पडले.

त्र्यंबकेश्वर एसटी स्थानकातून त्र्यंबकेश्वर ते पुणे या मार्गावरील एसटी बस रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रवाना झाली. पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगावनजीक मध्यरात्री एकच्या सुमारास टायर बदलण्यासाठी ट्रक थांबला होता. मुक्ताई रोपवाटिकेसमोर या रस्त्यात थांबलेल्या ट्रकवर एसटी बस आदळली. अपघातानंतर एसटी चालक संतोष यशवंत गुलदड (वय ३२, रा. पळशी, ता. बारामती), ट्रकचालक जोंधळे आणि त्यांच्यासोबत असलेला सहकारी चालक पठाण हे बसच्या चाकाखाली सापडले. अपघातात एसटीच्या केबिनचा चुराडा झाला. बसचालक गुलदड जखमी झाला असून त्याने अपघाताची माहिती नारायणगाव पोलिसांना दिली. नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक एल. एल. गोरड यांनी ही माहिती दिली.

अपघातात सात एसटी प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताननंतर मोठा आवाज झाल्याने स्थानिक नागरिक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना त्यांनी बाहेर काढले. जखमींना तातडीने पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालय, आळेफाटा तसेच नारायणगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नेमकी चूक कोणाची?

महामार्गावर ट्रक वा बसचे चाक पंक्चर झाल्यानंतर चालक सहकाऱ्यासह रस्त्याच्या कडेला वाहन लावतात. रात्रीच्या वेळी अंधारात थांबलेल्या ट्रकच्या मागील बाजूचे दिवे सुरू ठेवणे गरजेचे असते. बऱ्याचदा रस्त्यात थांबलेल्या वाहनांचे दिवे सुरू ठेवले जात नाहीत. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनाला रस्त्यात थांबलेले वाहन दिसत नाहीत. नारायणगावनजीक झालेल्या अपघातात ट्रकचालक जोंधळे याने दिवे सुरू ठेवले होता का नाही? हे समजू शकले नाही. रात्रीच्या वेळी महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव वाहनांचा वेग देखील गंभीर स्वरूपांच्या अपघातांना आमंत्रण देतो.