पुणे : ‘सरकारच्या विविध शिष्यवृत्ती योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवले जाते. तेथे उच्च शिक्षण घेऊन त्यांनी देशासाठी योगदान द्यावे, अशी अपेक्षा असते. मात्र, शिष्यवृत्ती घेऊन परदेशात शिक्षणासाठी गेलेले ९० टक्के तरुण परत येत नाहीत,’ अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने शनिवारी गणेश कला क्रीडा मंच येथे गुरुजन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी पवार बोलत होते. ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, ज्येष्ठ नृत्य कलाकार शमा भाटे यांना पवार यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी महापौर अंकुश काकडे, दीपक मानकर, आयोजक अप्पा रेणुसे, विजय जगताप, अभय मांढरे, मोनिका मोहोळ आदी या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या संस्थांच्या माध्यमातून शिष्यवृत्तीद्वारे परदेशात पाठवले जाते. मात्र, ९० टक्क्यांहून अधिक तरुण तेथेच नोकरी, व्यवसाय, उद्योग करत आहेत, असे या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. ही बाब खेदजनक असून, तरुण पिढीने देशासाठी योगदान देणे ही काळाजी गरज आहे.’
ज्येष्ठ उद्योजक फिरोदिया यांचे उदाहरण देऊन पवार म्हणाले, ‘आयआयटी मुंबई आणि अमेरिकेतील ‘एमआयटी’ या नामांकित संस्थांमध्ये शिक्षण घेऊन ते देशात परत आले. स्वत:चे ज्ञान, कौशल्य आणि दूरदृष्टीद्वारे त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी झोकून दिले. ही बाब तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.’
‘तंत्रज्ञान शिक्षण महत्त्वाचे’
‘गेल्या काही दिवसांत युद्धाचे स्वरूप बदलले आहे. शस्त्रांऐवजी जैवतंत्रज्ञान, सायबर आणि नवीन तंत्रज्ञानावर आधारित युद्ध होत आहेत. देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने सेंद्रिय शेती, भूगर्भशास्त्र, इलेक्ट्राॅनिक, जिओ थर्मल एनर्जी आणि तंत्रज्ञान हे विषय महत्त्वाचे झाले आहेत. त्यामुळे तरुण पिढीने या विषयांचे ज्ञान अवगत करावे,’ असे आवाहन अरुण फिरोदिया यांनी केले.
‘पुण्यात शास्त्रीय संगीत-नृत्य केंद्र’
‘पुण्यात देशपातळीवरील शास्त्रीय संगीत-नृत्य केंद्र झाले पाहिजे,’ अशी अपेक्षा शमा भाटे यांनी भाषणात व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, ‘देशातील सर्वांत मोठे शास्त्रीय संगीत-नृत्य केंद्र पुण्यात उभारले जाईल. त्यासाठी जिल्हा नियोजन समिती, महापालिका किंवा राज्य शासनाकडून मदत देण्यात येईल,’ असे आश्वासन दिले.