विद्याधर कुलकर्णी, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : नाशिकच्या संमेलनानंतर उदगीर येथील साहित्य संमेलनासाठी शासनाकडून निधी मिळविण्यात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला यश आले आहे. त्यामुळे आगामी ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शासकीय निधी प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

डिसेंबर २०२१ मध्ये येथे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. त्यानंतर मार्चअखेरीस उदगीर येथे ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार होते. मात्र, एकाच आर्थिक वर्षांमध्ये दोन संमेलने होत असल्याने उदगीर येथील संमेलनाला शासकीय अनुदान मिळेल का, हा प्रश्न उपस्थित झाला होता. मार्च महिना हा परीक्षांचा कालावधी ध्यानात घेता संमेलन घेण्याची असमर्थता संमेलनाची आयोजक असलेल्या उदयगिरी शिक्षण संस्थेने घेतली. त्यामुळे हे संमेलन २२ ते २४ एप्रिल या कालावधीत घेण्यात आले. मात्र, नाशिक येथील साहित्य संमेलन गेल्या वर्षीचे होते, या मुद्दय़ावर उदगीरच्या साहित्य संमेलनासाठी अनुदान प्राप्त करून घेण्यात आले, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली. 

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे साहित्य संमेलन स्थगित झाले होते. शासनाने बंदी घातल्यामुळे इच्छा असूनही नाशिक येथील साहित्य संमेलन घेता आले नाही. या संमेलनाच्या अनुदानाची रक्कम गेल्या वर्षीची असून ती रद्दबातल कशी ठरवता येईल, या मुद्दय़ाकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते, असे ठाले पाटील यांनी सांगितले.

उदगीर संमेलनाला निधी देता येणार नाही असे कसे करता येईल, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. हा युक्तिवाद मान्य करून शासनाने अनुदानाची रक्कम दिली, असे त्यांनी सांगितले. साहित्य महामंडळाचे कार्यालय १ मेपासून मुंबई मराठी साहित्य संघाकडे गेले आहे, तर विदर्भ साहित्य संघाचे शताब्दी वर्ष असल्याने ही संस्था आगामी ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यास उत्सुक आहे. उदगीरच्या संमेलनाला शासनाचे अनुदान प्राप्त झाल्यामुळे २०२३ मध्ये होणाऱ्या संमेलनासाठी शासनाकडून धी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

का झाली दोन संमेलने?

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या घटनेनुसार मराठवाडा साहित्य परिषदेकडे तीन वर्षांच्या कालावधीसाठी साहित्य महामंडळाचे कार्यालय होते. उस्मानाबाद येथे जानेवारी २०२० मध्ये झालेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर करोना प्रादुर्भावामुळे जवळपास दोन वर्षे साहित्य संमेलन होऊ शकले नव्हते. त्यामुळे नाशिक येथील संमेलनानंतर मार्चअखेर महामंडळ पदाधिकाऱ्यांची मुदत संपत असल्याने उदगीर येथील संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, परीक्षांचा कालावधी ध्यानात घेऊन हे संमेलन एक महिना उशिराने झाले. १ मेपासून साहित्य महामंडळाचे कार्यालय मुंबई मराठी साहित्य संघाकडे हस्तांतरित झाले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 96th all india marathi sahitya sammelan to get government funding zws
First published on: 23-05-2022 at 02:53 IST