पुणे : करोना साथरोगाच्या काळात आटोक्यात आलेल्या स्वाइन फ्लूने यंदा राज्यात पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र आहे. यंदाच्या वर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत राज्यातील २३३७ रुग्णांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाला आहे, तर ९८ रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. पुणे, ठाणे, कोल्हापूर, नाशिक आणि नागपूरमध्ये स्वाइन फ्लू संसर्ग आणि मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असून उपचार सुरू करण्यास होणारा विलंब हे या आजारात मृत्यू होण्याचे मुख्य कारण असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी राज्यातील स्वाइन फ्लू संसर्गाबाबतचे चित्र स्पष्ट केले. डॉ. आवटे म्हणाले,की जानेवारी ते ऑगस्ट २०२२ या काळात राज्यात २३३७ जणांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट आहे. मुंबई आणि ठाणे येथे अनुक्रमे ३४८ आणि ४७४ रुग्ण आहेत, तर १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात ७७० रुग्ण आणि ३३ मृत्यू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात १५९ रुग्ण आणि १३ मृत्यू तर नाशिक जिल्ह्यात १९५ रुग्ण आणि १२ मृत्यू आहेत. नागपूर जिल्ह्यात १९८ रुग्ण आणि नऊ मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. ज्या रुग्णांना फ्लूची लक्षणे आहेत त्यांनी त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि उपचार सुरू करावेत, असे आवाहन डॉ. आवटे यांनी केले आहे.

दरम्यान, १०२-१०३ ताप, थंडी वाजणे, घसा दुखणे, अंग दुखणे, डोके दुखणे, थकवा येणे, उलटय़ा, जुलाब ही लक्षणे असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, लहान मुले अशा जोखीम गटातील रुग्णांनी लक्षणे अंगावर काढू नयेत असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

फ्लूची लस दरवर्षी घेणे आवश्यक

लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिला यांनी नियमितपणे म्हणजे दर वर्षी स्वाइन फ्लूची लस घेणे आवश्यक आहे. या लशीमध्ये स्वाइन फ्लूसह आणखी दोन प्रकारच्या फ्लूपासून संरक्षण मिळते, त्यामुळे त्याचा उपयोग संसर्गाची तीव्रता कमी ठेवण्यासाठी होतो. सरकारी तसेच महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ही लस उपलब्ध आहे. मात्र फॅमिली डॉक्टरकडे देखील रुग्ण ही लस घेऊ शकतात.