शिरूर : कान्हूर मेसाई येथील ढगे वस्तीवर पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी निघालेल्या अंकुश खर्डे (वय ६०) या शेतकऱ्याला बिबट्याने लक्ष्य केले.बिबट्याने केलेल्या हल्ल्यात खर्डे यांच्या तोंडाला हाताला जखमा झाल्या असून त्यांच्यावर शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान हल्ला केला त्या ठिकाणी बिबट्यास जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला असल्याचे वनाधिकारी प्रताप जगताप यांनी सांगितले .
बिबट्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी पहाटे सहा वाजता ढगेवाडी वस्तीवर घडली. या वस्तीवर अंकुश खर्डे हे आपल्या कुटुंबासमवेत राहतात. ते नेहमी प्रमाणे सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले. त्याच रस्त्यावर त्यांची विहीर असल्याने पिण्याची पाण्याची मोटार सुरू करायला गेले. त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक अंकुश खर्डे यांच्यावर हल्ला केला. खर्डे यांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या तेथून पळून गेला. या हल्ल्यात खर्डे यांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत.
हेही वाचा >>>५०० ते ६०० टन ऊस असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ; अजित पवार म्हणाले…
दरम्यान हल्ल्यात जखमी झालेल्या खर्डे यांना शासकीय मदतीचा प्रस्ताव पाठविणार असल्याचे तालुका वनाधिकारी प्रताप जगताप यांनी सांगितले. कान्हूर मेसाई परिसरातील ढगेवाडीस भेट देवून जगताप यांनी बिबट्याने खर्डे यांच्यावर झालेल्या ठिकाणाची पाहणी केली. त्याचबरोबर या ठिकाणी बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.