पुणे : वैष्णवी हगवणे यांच्या मुलाचा ताबा घेण्यासाठी आलेल्या कस्पटे कुटुंबीयांना धमकविल्याप्रकरणी कर्वेनगर येथील नीलेश रामचंद्र चव्हाण याच्याविरुद्ध गुरुवारी रात्री वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चव्हाणने कस्पटे कुटुंबीयांना पिस्तूल दाखवले होते. त्यानुसार चव्हाणवर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत वैष्णवी हगवणे यांचे काका मोहन कस्पटे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नीलेश रामचंद्र चव्हाण ( रा. कर्वेनगर) याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३५१(३) आणि शस्त्र बाळगल्याप्रकरणी कलम ३० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैष्णवी हगवणे यांनी १६ मे रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. वैष्णवी यांना विवाह झाल्यापासून हगवणे कुटुंबीयांकडून त्रास देण्यात येत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याबाबत वैष्णवी यांची मैत्रिणीबरोबरच्या संभाषणाची ध्वनिफीत प्रसारित झाल्यानंतर राज्यभरात हे प्रकरण गाजले. वैष्णवी हगवणेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या दहा महिन्यांच्या बाळाला घरी आणण्यासाठी कस्पटे कुटुंबीयांकडून प्रयत्न सुरू होते. ते बाळ नीलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे होते. कस्पटे कुटुंबीय चव्हाणच्या कर्वेनगर येथील घरी गेले होते. मात्र, त्याने त्यांच्याशी वाद घातला. त्याच्याकडील पिस्तूल दाखवले. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चव्हाण याच्याकडे पिस्तुलाचा परवाना असल्याची माहिती वारजे पोलिसांनी दिली. वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

मूल वैष्णवी यांच्या आई-वडिलांकडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैष्णवी आणि शशांक यांना दहा महिन्यांचे मूल आहे. हे मूल शशांक याच्या वारजे माळवाडी येथील नातेवाइकांकडे होते. ते गुरुवारी वैष्णवी यांच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केल्याचे सहायक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांनी सांगितले.