नांदेड रुग्णालयातील बळी प्रकरणी आरोग्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा : सुषमा अंधारे

नांदेड येथील रुग्णालयात २४ नागरिकांचा बळी गेला असून त्या घटनेला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. तर या विभागाचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.

Sushma Andhare
नांदेड रुग्णालयातील बळी प्रकरणी आरोग्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा : सुषमा अंधारे (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पुणे : नांदेड येथील रुग्णालयात २४ नागरिकांचा बळी गेला असून त्या घटनेला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. तर या विभागाचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, नांदेड येथील रुग्णालयात उपचाराअभावी निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. मागील तीन दिवसांत महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर गेली असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य सरकारमधील मंत्र्यांचे नाराजी नाट्य सोडवण्यासाठी दिल्लीला गेले, अशी त्यांनी टीका केली. तसेच, महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी दीडशे बैठका घेतल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे अनेक वेळा सांगतात. पण नांदेड घटनेनंतर राज्यातील आरोग्य विभागातील रिक्तपद आणि अपुरा औषधसाठ्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे सरकार पाडण्यासाठी दीडशे बैठका घेणाऱ्यांनी सर्व सामन्याच्या आरोग्याच्या दृष्टीने एक जरी बैठक घेतली असती, तर आज निष्पाप नागरिकांचा बळी गेला नसता. त्यामुळे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा – पुणेरी मेट्रोला महामेट्रोशी जोडणार!, दीडशे मीटरचा पादचारी पूल उभारणार

करोना काळात उद्धव ठाकरे यांनी घरी बसून काम केल्याचे अनेक जण बोलतात. पण उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी आरोग्य व्यवस्था चोख सांभाळली होती. तर त्यावेळचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीदेखील चांगले काम केले होते. त्या कामाची दखल जागतिक स्तरावर घेतली होती. तसेच देशातील पाहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचे नाव आले होते. त्यामुळे विद्यमान मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी या सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्यात, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना सुनावले.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधील झोपड्यांना ‘गुगल प्लस कोड’

खासदार हेमंत पाटील यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे – सुषमा अंधारे

नांदेड रुग्णालयाचे अधिष्ठाता शाम वाकोडे यांना खासदार हेमंत पाटील यांनी शौचालय साफ करण्यास लावल्याची घटना घडली. या प्रकरणी हेमंत पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराबाबत सुषमा अंधारे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, हेमंत पाटील यांना एवढी मस्ती येते कुठून, आदिवासी अधिकाऱ्याला स्वच्छता करायला लावता. नांदेडमधील प्रकरण झाकण्यासाठी हे करण्यात आल आहे. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांबाबत एखाद्याने सोशल मीडियावर पोस्ट केल्यावर लगेच संबधित व्यक्तीवर तातडीने कारवाई होते. पण एका आदिवासी भागातील अधिकाऱ्याबाबत जो प्रकार खासदार हेमंत पाटील यांनी केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊनदेखील राज्याच्या गृहमंत्र्यांनी कारवाई का केली नाही, असा सवालदेखील सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A case of culpable homicide should be filed against the health minister in the nanded hospital victim case says sushma andhare svk 88 ssb

First published on: 04-10-2023 at 13:57 IST
Next Story
पिंपरी-चिंचवडमधील झोपड्यांना ‘गुगल प्लस कोड’