राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) महाराष्ट्रासह जवळपास १५ राज्यांमधील ९३ ठिकाणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेवर छापे टाकले आहेत. दहशतवादी कारवायांना पाठबळ दिल्याच्या आरोपावरून ‘एनआयए’ने ही कारवाई करून ‘पीएफआय’च्या सदस्यांना अटक केली आहे. त्यात महाराष्ट्रातीलही अनेक जणांचा समावेश आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) नेतृत्वाखाली सक्तवसुली संचालनालय (ईडी), दहशतवादविरोधी पथके, स्थानिक पोलिसांच्या मदतीने हे छापे टाकण्यात आले आहेत.

NIA, ED या केंद्रीय यंत्रणांनी पुण्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापेमारी करून, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) संघटनेच्या अनेकांची धरपकड केली असता, पुण्यात काही जणांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचाही प्रकार समोर आला आहे. यावरून आता राजकीय वातावरण चांगलच तापत आहे. विरोधकांकडूनही राज्यसरकार आणि भाजपाला जाब विचारला जात आहे. या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

हेही वाचा : पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणाबाजीवर मुख्यमंत्री शिंदेंची कडक शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले…

आज पुण्यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “अशी घोषणा आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्रात आणि भारतात ही घोषणा खपवून घेतली जाणार नाही. मी पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे. देशद्रोहाचा गुन्हा अशा लोकांवर लागलाच पाहिजे.”

PHOTOS : पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ विरोधात मनसे आक्रमक; अलका टॉकीज चौकात जोरदार आंदोलन

याचबरोबर “पीएफआयचा तपास हा मागील काही वर्ष सातत्याने पुरावे जमा करून करण्यात आला आहे. या संदर्भात विविध राज्यांनीही काही काम केलेलं आहे. मागील काळात मी गृहमंत्री असताना महाराष्ट्रात त्यांच्या हालचालींवर आम्ही लक्ष ठेवून होतो. मागील काळात तर केरळ सारख्या सरकारनेही पीएफआयवर बंदी घालावी अशी मागणी केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कोणी काहीही केलं, तरी त्यावर सरकारचं, केंद्रीय आणि राज्याच्या यंत्रणांचं जे लक्ष आहे ते विचलीत होणार नाही. निश्चितपणे जे देशविरोधी कारवाया करतात, त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल. पीएफआयच्या बंदीच्या संदर्भात केंद्र सरकार योग्य तो निर्णय करेल.” असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

याशिवाय “दोन वेगवेगळे व्हि़डीओ आले आहेत, त्याची तपासणी होईल. परंतु महाराष्ट्रात जर कोणी पाकिस्तानचे नारे देणार असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा आम्ही दाखल करू, आम्ही दाखल केला आहे.” अशी माहिती देखील फडणवीसांनी यावेळी प्रसारमाध्यमांना दिली.