पोलीस असल्याच्या बतावणीने महाविद्यालयीन तरुणाला धमकावून त्याला लुटल्याची घटना नऱ्हे भागात घडली. या प्रकरणी सिंहगड पोलिसांकडून तोतया पोलिसाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका महाविद्यालयीन तरुणाने सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण नऱ्हे भागातील एका सोसायटीत राहायला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तोतयाने खडकी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक असल्याची बतावणी तरुणाकडे केली होती.

हेही वाचा : कर्ज प्रकरणातील तगाद्यामुळे जामीनदाराची आत्महत्या; पोलिसांसह तिघांवर गुन्हा

आठवड्यापूर्वी तोतया तरुणाच्या घरी गेला. तु सदनिकेवर मुला-मुलींना घेऊन येतो. सदनिकेत गोंधळ घालत असल्याची तक्रार पोलिसांकडे आली आहे, अशी बतावणी तोतया पोलिसाने केली. त्यानंतर तरुणाला कारवाई करण्याची भीती घालून तोतयाने त्याच्याकडून २० हजार रुपये उकळले. तरुणाने चौकशी केली असता फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्याने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली असून सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव तपास करत आहेत.