A decision taken tomorrow regarding title registration of fragmented lands pune print news ysh 95 | Loksatta

पुणे: तुकड्यातील जमिनींच्या दस्त नोंदणीबाबत उद्या निर्णयाची शक्यता

राज्यात तुकडेबंदी कायदा अस्तित्वात असूनही जमिनींचे तुकडे पाडून दस्त नोंदणी करण्यात येत होती.

पुणे: तुकड्यातील जमिनींच्या दस्त नोंदणीबाबत उद्या निर्णयाची शक्यता
फाईल फोटो लोकसत्ता

पुणे : राज्यात तुकडेबंदीबाबत दाखल करण्यात आलेल्या पुनराविलोकन याचिकेवर सुनावणी होऊन औरंगाबाद उच्च न्यायालयाने दस्त नोंदणीला तूर्त स्थगिती दिली असताना, या याचिकेवर एक डिसेंबर रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे. या निर्णयावर तुकड्यातील जमिनींच्या दस्त नोंदणीचे भवितव्य अवलंबून आहे.

राज्यात तुकडेबंदी कायदा अस्तित्वात असूनही जमिनींचे तुकडे पाडून दस्त नोंदणी करण्यात येत होती. याबाबत अनेक गैरप्रकार समोर आल्यानंतर तुकड्यातील एक-दोन गुंठे जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांची दस्त नोंदणी करण्यास बंदी घालण्यात आली. तसेच, अशा प्रकारच्या जमिनींची खरेदी-विक्री करायची असल्यास संबंधित क्षेत्राचे रेखांकन (ले-आऊट) करून जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेणे बंधनकारक करण्यात आले होते. या निर्णयाला औरंगाबाद उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र, त्यावर दाखल पुनराविलोकन याचिकेवर सुनावणी होऊन औरंगाबाद उच्च न्यायालयाने तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून होणाऱ्या दस्त नोंदणीला तूर्त स्थगिती दिली आहे. याबाबतची सुनावणी १ डिसेंबरला होणार आहे.

हेही वाचा >>> राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ; मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाची हजेरी

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने १२ जुलै २०२१ रोजी तुकडेबंदी तुकडेजोड सुधारणा अधिनियमाच्या कलम-ब नुसार परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार एक-दोन-तीन गुंठे जागांचे व्यवहार करताना संबंधित क्षेत्राचे रेखांकन करून जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतल्यास दस्त नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याकरिता प्रत्येक जिल्ह्याचे प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार नाकारले जात होते. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. सुनावणी घेऊन न्यायालयाने हे परिपत्रक रद्द करण्याचे आदेश दिले. मात्र, या निर्णयाविरोधात पुनराविलोकन याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर सुनावणी होऊन औरंगाबाद खंडपीठाने तुकड्यातील जमिनींची दस्त नोंदणी १६ नोव्हेंबरपर्यंत करण्याला स्थगिती दिली होती. त्यानंतर २४ नोव्हेंबरला सुनावणी होऊन १ डिसेंबरपर्यंत या निर्णयाला औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. दरम्यान, औरंगाबाद खंडपीठाने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे परिपत्रक रद्द केले होते. तरीदेखील पुनराविलोकन याचिका दाखल केली असल्याने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून तुकड्यातील जमिनींची दस्त नोंदणी करण्यात येत नाही.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 10:03 IST
Next Story
पुणे: जेजुरी रज्जू मार्गाला वेग; खासगी कंपनीला ३.४० हेक्टर जागा देण्यास शासनाची मान्यता