एफटीआयआय स्टुडंटस असोसिएशनने माहितीपट दाखविल्याचा प्रकार उघड; परवानगी घेतली नसल्याचे एफटीआयआय प्रशासनाचे स्पष्टीकरण,संपूर्ण माहितीनंतरच निर्णय घेणार
केंद्र सरकारची बंदी असलेला बीबीसी निर्मित गुजरात दंगलीवरील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील माहितीपट परवानगीविना राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेमध्ये (एफटीआयआय) दाखविण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे एफटीआयआय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा >>>पुणे: मार्केट यार्डातील बेकायदा लिंबू विक्रेत्यांवर कारवाईच्या निषेधार्थ ‘दलित पॅंथर’चे आंदोलन
एफटीआयआय स्टुडंटस असोसिएशनतर्फे प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी विसडम ट्रीजवळील मोकळ्या जागेमध्ये हा माहितीपट दाखविण्यात आला. संगीत, माहितीपट किंवा चित्रपटावर अशा प्रकारे बंदी घालू शकत नाही. ते दाखविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे, यासाठी आम्ही माहितीपटाचे प्रदर्शन करून त्याविरोधातील बंदीचा निषेध केल्याचा दावा स्टुडंट्स असोसिएशनने केला आहे.
हेही वाचा >>>पुणे: राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या कार्यालयातील टेबल, खुर्च्या चोरीला; भांडार कक्षाचे कुलूप तोडून चोरी
लोकशाही देशात चित्रपटांवर बंदी घातली जाऊ शकत नाही. चित्रपट पाहणे हे सेन्सॉरशिपला उत्तर आहे. कोणी काय पाहावे हा निर्णय नागरिकांवर सोडून दिला पाहिजे, इतकेच या माहितीपटाच्या प्रदर्शनाद्वारे आम्हाला म्हणायचे आहे, अशी भूमिका स्टुडंटस असोसिएशनतर्फे मांडण्यात येत आहे. तर, परवानगी न घेता विद्यार्थ्यांनी हा माहितीपट दाखविला आहे. त्याविषयी माहिती घेऊन निर्णय घेऊ, असे एफटीआयआय प्रशासनाने सांगितले आहे.
माहितीपट दाखविण्यासाठी विद्यार्थ्यांनी परवानगी घेतली नव्हती. संपूर्ण प्रकरणाची पूर्ण घेतली जाईल आणि मग निर्णय घेण्यात येईल.- सईद रबीहाश्मी, कुलसचिव, एफटीआयआय