पुणे : मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत मिळविण्यासाठी महिलांच्या नावावर सदनिका खरेदी केल्यावर १५ वर्षांपर्यंत त्या सदनिकेची विक्री करता येत नव्हती. आता मात्र राज्य सरकारने या अटीतून महिलांची सुटका केली आहे. त्यामुळे आता कधी आणि कोणालाही या सदनिकेची विक्री करणे शक्य होणार आहे.
महिलांचा उचित सन्मान व्हावा, पुरुषांच्या बरोबरीने त्यांना मान मिळावा आणि त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करीत राज्य सरकारने ३१ मार्च २०२१ मध्ये याबाबतचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महिलेच्या नावावर सदनिका घेतल्यानंतर मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत दिली जात होती. मात्र, अशी सवलत घेतल्यानंतर सदनिका खरेदी केल्यापासून १५ वर्षांपर्यंत त्या सदनिकेची विक्री करता येणार नाही. तसेच अशा सदनिकांची विक्री केवळ महिलांनाच करता येईल, अशी अट घालण्यात आली होती. त्यामुळे या योजनेचा लाभ घेतल्यानंतर काही अडचण आल्यास सदनिकांची विक्री करून पैसे उभे करणे महिलांना शक्य होत नव्हते. तसेच मुदतपूर्व विक्री केल्यानंतर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून एक टक्का सवलत दिलेले मुद्रांक शुल्क वसूल करण्यात येत होते. त्यातून गैरप्रकार सुरू झाले होते. त्यामुळे या जाचक अटी रद्द कराव्यात, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात येत होती. त्याची दखल घेत राज्य सरकारने महाराष्ट्र मुद्रांक अभिनियमात बदल करीत ही जाचक अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे आदेश राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाचे उपसचिव सत्यनारायण बजाज यांनी प्रसृत केले.
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A flat purchased in the name of a woman can be sold at any time pune amy