पीएमपी प्रवासी महिलांकडील दागिने लांबविणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली. चोरट्यांकडून सात गुन्हे उघडकीस आले असून सहा लाख ८५ हजारांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. सर्फराज दत्तू गायकवाड (वय ४१), योगेश गणेश माने (वय ४०), अमित नाना चव्हाण (वय २६), संतोष शरणप्पा जाधव (वय ३७), राजेंद्र ज्ञानेश्वर थेऊरकर (वय ४२, सर्व रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून पीएमपीने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांकडील दागिने लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाकडून चोरट्यांचा माग काढण्यात येत होता. चोरट्यांनी महिलांच्या हातातील बांगड्या गर्दीत कटरचा वापर करून कापून नेल्या होत्या.

पुणे स्टेशन परिसरात चोरटे रिक्षातून येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर सापळा लावून पोलिसांनी चोरट्यांना पकडले. तपासात चोरट्यांनी डेक्कन जिमखाना, भारती विद्यापीठ, शिवाजीनगर भागात प्रवासी महिलांकडील दागिने लांबविल्याचे उघडकीस आले. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश संखे, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, दत्ता सोनवणे, अनिकेत बाबार, राहुल मखरे, शशीकांत दरेकर आदींनी ही कारवाई केली.