scorecardresearch

पुणे:अतिक्रमणावर कारवाईसाठी पाठपुरावा करणाऱ्या पत्रकारावर कोयत्याने हल्ला; आई-वडिलांनाही मारहाण

हल्ल्यासह पत्रकार संरक्षण अधिनियमानुसार मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे:अतिक्रमणावर कारवाईसाठी पाठपुरावा करणाऱ्या पत्रकारावर कोयत्याने हल्ला; आई-वडिलांनाही मारहाण
प्रातिनिधिक फोटो-लोकसत्ता

सोसायटीच्या आवारातील मोकळ्या जागेत बिअर शॉपी थाटल्याच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये देऊन या अतिक्रमणावर कारवाईसाठी पाठपुरावा करणाऱ्या पत्रकारावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री मुंढवा परिसरात घडला. पत्रकाराच्या आई-वडिलांनाही मारहाण करण्यात आली. यासंदर्भात हल्ल्यासह पत्रकार संरक्षण अधिनियमानुसार मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>पुणे रेल्वे स्थानकातील सुरक्षेबाबत अधिकारी धारेवर; स्थानक सल्लागार समिती बैठक

पत्रकार अमित तानाजी रुके (वय २७, रा. प्रियांका रेसिडेंसी, मुंढवा) हे या हल्ल्यात जखमी झाले. यासंदर्भात तीनजणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुरेंद्र पिल्ले (वय ६५), विशाल सुरेंद्र पिल्ले (वय ४०) आणि आशिष पिल्ले (वय ३५, सर्व रा. गणेशनगर, वाठारे वस्ती, मुंढवा ) ही संशयित आरोपींची नावे आहेत. त्यातील विशाल पिल्ले याला पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा >>>पुणे: अनुसूचित जातीच्या उमेदवारांना नवउद्यमीसाठी प्रशिक्षण

मुंढवा येथील खासगी सोसायटीच्या पार्किंगमध्ये संशयित आरोपींनी अतिक्रमण करून बिअरशॉपी आणि हार्डवेअरचे दुकान चालू केले होते. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना वाहने उभी करण्यास अडथळा निर्माण झाला होता. त्याबाबत पत्रकार रुके यांनी वृत्तपत्रामध्ये वृत्तांकन करून सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे, संशयित आरोपींनी रुके कुटुंबियांवर हल्ला केला. रुके यांच्या आई-वडिलांना मारहाण केली. रुके यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर कोयत्याने हल्ल्ला केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-12-2022 at 16:24 IST

संबंधित बातम्या