पुणे: विरुद्ध दिशेने भरधाव जाणाऱ्या फॉर्च्युनर मोटारीची धडक बसून झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार वकिलाचा मृत्यू झाला. पानशेत ते पुणे रस्त्यावरील मनेरवाडी येथील हाॅटेल तारांगणसमोर बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातामध्ये एका वकिलाला प्राण गमवावे लागले. अनिकेत अरुण भालेराव (३५, रा. वरदाडे, ता. हवेली, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार वकिलाचे नाव आहे. ते शिवाजीनगर न्यायालयामध्ये वकिली करत होते.
याप्रकरणी त्यांचे काका शांताराम गोपाळ भालेराव (५२) यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान, दुचाकीला उडवल्यानंतर फॉर्च्युनर मोटारीचा चालक आणि एक युवती घटनास्थळावरून पसार झाले. हवेली पोलिसांनी याप्रकरणी फॉर्च्युनर मोटारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत भालेराव बुधवारी दुपारी चारच्या सुमारास भाजीपाला आणण्यासाठी खानापूर येथे गेले होते. साडेचारच्या सुमारास ते तारांगण हॉटेलसमोरून जात असताना, समोरून आलेल्या भरधाव फॉर्च्युनर मोटारीने त्यांना जोराची धडक दिली. यात अनिकेत गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला, दोन्ही गुडघ्यांना, तसेच डाव्या हाताला मार लागला. सुरुवातीला त्यांना खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शहरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी अनिकेत यांना मृत घोषित केले.
दरम्यान, प्रत्यक्षदर्शी आणि अनिकेत यांच्या नातेवाइकांनी, फॉर्च्युनर मोटारीचा चालक अपघातावेळी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा दावा केला. अपघातावेळी मोटारीमध्ये एक युवतीदेखील होती, अशी माहिती त्यांनी दिली. अपघातानंतर दोघेही घटनास्थळावरून पसार झाले. मोटारचालकही एका खासगी रुग्णालयात गेल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसून आले.
आम्ही घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली आहेत. मोटार चालकावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मद्यपान केल्याचा संशय असल्याने आम्ही त्याच्या रक्ताचे नमुनेदेखील घेतले आहेत. त्याचा अहवाल आलेला नाही. दरम्यान, डॉक्टरांनी मोटारचालकाला रुग्णालयातून सोडल्यानंतर आम्ही लगेचच त्याला अटक करणार आहोत. – सचिन वांगडे, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे</strong>