रेल्वेतून पुणे स्थानकावर उतरत असताना त्या प्रवाशाचा पाय घसरला… काही क्षणात तो फलाट आणि गाडीमधील जागेतून थेट रुळांवर पडण्याची चिन्हे दिसू लागल्याने हे दृश्य पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला… पण, म्हणतात ना दैव बलवत्तर असेल तर कोणत्याही प्रसंगातून सुखरूप बाहेर येता येते. तसेच काहीसे या प्रवाशाच्या बाबतीतही घडले. रेल्वेतून पाय घसरून तो रुळावर कोसळण्याच्या स्थितीत असतानाच जीवनदान देणारे हात त्याच्या मदतीला आले… पुणे रेल्वे स्थानकावर शनिवारी हा प्रसंग अनेकांनी अनुभवला.

हेही वाचा >>> पुणे : खड्ड्यात अडकलेल्या शेळ्यांची अग्निशमन दलाकडून सुटका ; वडगाव बुद्रुक भागातील घटना

शनिवारी हुसेनसागर एक्स्प्रेस पुणे स्थानकावर आली. ही गाडी पुढे मुंबईला जाणार होती. पुण्यात गाडी थांबत असताना एक प्रवासी गडबडीत खाली उतरण्याचा प्रयत्न करीत होता. अशातच त्याचा पाय घसरला आणि काही कळायचा आत तो फलाटावर कोसळला. काही क्षणातच गाडी आणि फलाटाच्या मधोमध असलेल्या जागेतून तो थेट रुळावर जाण्याची शक्यता होती. हा प्रसंग पाहताक्षणीच जवळच उभ्या असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी वायूवेगाने हालचाल केली. या प्रवाशाला तातडीने ओढून बाजूला काढले आणि रुळावर पडण्यापासून वाचविले.

हेही वाचा >>> पुणे : देखावे पाहण्यासाठी मध्यभागात गर्दी

रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक एस. के. शर्मा, प्रफुल्ल खर्चे आणि आर. के. सोनकर यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे या प्रवाशाचे प्राण वाचू शकले. रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेबद्दल पुणे रेल्वेच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांनीही त्यांचे कौतुक केले. घाई-गडबडीत रेल्वे गाडीत चढताना किंवा उतरताना अनेकदा अपघात घडत असतात. त्यात काहींचा मृत्यू झाल्याचे किंवा गंभीर जखमी होण्याच्या घटनाही घडतात. पण, संकटात सापडलेल्या या प्रवाशाला मदतीच्या तत्पर हातांमुळे जीवदानच मिळाले. या प्रवाशाने सुरक्षा दलाच्या जवानांचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले. रेल्वे गाडी सुरू असताना गाडीतून उतरण्याचा किंवा चढण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.