scorecardresearch

बारामतीत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला लुटले; विद्यार्थ्याला विवस्त्र करुन ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी

बारामती परिसरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थ्याला धमकावून त्याच्याकडील १५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटून नेल्याची घटना उघडकीस आली.

बारामतीत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला लुटले; विद्यार्थ्याला विवस्त्र करुन ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
बारामतीत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला लुटले(Photo : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पुणे : बारामती परिसरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थ्याला धमकावून त्याच्याकडील १५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटून नेल्याची घटना उघडकीस आली. विद्यार्थ्याला एका शेतात नेऊन चोरट्यांनी विवस्त्र करुन ध्वनिचित्रफीत तयार केली. ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन चोरट्यांनी विद्यार्थ्याला एटीएम केंद्रात नेऊन त्याच्या खात्यातून पुन्हा १४ हजार ५०० रुपयांची रोकड काढली.

हेही वाचा >>>कळवा रेल्वे स्थानकात महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली

या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका विद्यार्थ्याने बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संबंधित विद्यार्थी हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत असून तो महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहायला आहे. तो रविवारी (४ डिसेंबर) सायंकाळी बारामतीतील सुभद्रा माॅल येथे खरेदी करुन वसतिगृहाकडे निघाला होता. त्या वेळी दुचाकीस्वार विद्यार्थ्याला चोरट्यांनी काही अंतरावर अडवले. त्याला शिवीगाळ आणि दमदाटी केली. विद्यार्थ्याच्या खिशातील १५ हजार रुपयांची रोकड काढून घेतली.

हेही वाचा >>>ठाण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात क्लस्टरचा अडसर; आमदार संजय केळकर यांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र

विद्यार्थ्याने चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चोरट्यांचे दोन साथीदार दुचाकीवरुन तेथे आले. दुचाकीस्वार चाेरट्यांनी विद्यार्थ्याला दुचाकीवर बसण्यास सांगितले. त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. गोरड हाॅस्पिटलजवळ उसाच्या शेतात चोरट्यांनी दुचाकी नेली. त्याला पुन्हा मारहाण करण्यात आली. मारहाणीत त्याचा अंगठा फ्रॅक्चर झाला. विद्यार्थ्याला विवस्त्र करुन चोरट्यांनी मोबाइलवर ध्वनिचित्रफीत तयार केली. ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन विद्यार्थ्याला रात्री साडेआठच्या सुमारास एका बँकेच्या एटीएम केंद्रात नेले. विद्यार्थ्याला धमकावून डेबिट कार्ड; तसेच सांकेतिक शब्द चोरट्यांनी घेतला.

डेबिट कार्डचा वापर करुन चोरट्यांनी बँक खात्यातून १४ हजार ५०० रुपये काढून घेतले. चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. बारामती तालुका पोलिसांकडून पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी एटीएम केंद्र परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 16:24 IST

संबंधित बातम्या