शिरूर : कल्याणीनगर परिसरातील अपघात प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असताना शिरूर तालुक्यातही एका पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने मालवाहू पिकअप चालविताना दुचाकीला धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा गंभीर होता, की पिकअपने मोटारसायकलसह चालकास ३० फूट फरफटत नेले. या अपघातात दुचाकीचालक अरुण मेमाणे याचा जागीच मृत्यू झाला, तर महेंद्र बांडे हा गंभीररीत्या जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, लेंढे कुटुंबीय मालवाहतूक टेम्पो घेऊन जात होते. गाडीमध्ये आई-वडील, मुलगा आणि मुलगी होते. अरणगावातील पोलीस पाटील संतोष लेंडे यांची अल्पवयीन मुलगी गाडी चालवत होती. तिच्यासोबत शेजारील आसनावर पोलीस पाटील संतोष लेंडे बसले होते. मुलीने तिच्या ताब्यातील वाहन भरधाव चालवून दुचाकीला समोरून धडक देत अपघात केला. अपघात झाल्यानंतर मदत न करता ते दोघेही वाहन सोडून तेथून निघून गेले. या संदर्भात सतीश विठ्ठल मेमाणे (रा. वडगाव बांडे, ता. दौंड) यांनी फिर्याद दाखल केली असून, याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A minor girl hit a bike while driving a cargo pickup pune print news amy