शाळा-महाविद्यालयांचे नवे शैक्षणिक वर्ष नुकतेच सुरू झाले. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांमध्ये वैविध्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत. गेल्या आठवडाभरातही शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये अनेक उपक्रम राबवण्यात आले. त्यात संगीत वर्गाच्या उद्घाटनापासून सौर ऊर्जा जाणीवजागृती कार्यक्रमापर्यंतचा समावेश होता.
विद्यार्थ्यांना शालेय वयातच संगीताची गोडी लावली जाते. त्या दृष्टीने डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत संगीत वर्ग स्थापन करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात या वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. शाळेचे माजी विद्यार्थी समीर माळी, चिन्मय खळदकर, महेश दाबक यांनी दिलेल्या आर्थिक साह्यातून हा संगीत वर्ग तयार करण्यात आला. संगीत वर्गाची सर्व अंतर्गत सजावट समीक्षा वाघ, रवी देशपांडे यांनी केली आहे. विद्यार्थ्यांतील कलाविष्काराला योग्य वाव देऊन त्यांचे भावविश्व समृद्ध करण्यासाठी, गायन कलेची गोडी, भारतीय वाद्य परंपरेची ओळख व्हावी, या हेतूने हा संगीत वर्ग तयार केल्याचे मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी सांगितले. पालक संघ अध्यक्ष प्रणव जोशी, शिक्षिका तनुजा तिकोने, धनंजय तळपे, गायन शिक्षिका वैशाली पाटील, मीनल कचरे, भाग्यश्री हजारे या वेळी उपस्थित होते.
एकीकडे देश आर्थिक महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत असताना देशासमोर अनेक आव्हानेही आहेत. भौगोलिक लाभांशामुळे (डेमोग्राफिक डिव्हिडंड) देशात तरुणांची संख्या सर्वाधिक असली, तरी ही तरुणाई निरोगी आणि व्यसनमुक्त असण्याचे आव्हान आहे. जागतिक अमली पदार्थविरोधी दिन नुकताच झाला. त्या निमित्ताने अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये अमली पदार्थांचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजाविण्यात आले. आंबेगाव येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडिअम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील एनएसएस विभागातर्फे जागतिक अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त आंबेगाव पोलीस स्टेशनच्या सहकार्याने उपक्रम राबवण्यात आला.
एनएसएसचे विद्यार्थी व विद्यार्थिनींना अमली पदार्थ, त्यांच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम, तसेच विक्री संदर्भातील कायद्यातील तरतुदी, शिक्षा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, गुड टच बॅड टच, लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२, हेल्पलाइन क्रमांकाबाबत माहिती देण्यात आली. अमली पदार्थ सेवन न करण्याबाबत कार्यक्रम अधिकारी विनोदकुमार बंगाळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शपथ दिली. तसेच शालेय परिसरात जनजागृती फेरीही काढण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, सहायक पोलीस निरीक्षक स्वाती देवधर, प्रियंका गोरे, संस्थेचे संस्थापक राजीव जगताप, सचिव सुनीता जगताप, सहसचिव निर्मोही जगताप, प्राचार्या वर्षा शर्मा, पर्यवेक्षिका सुनीता यादव या वेळी उपस्थित होते.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थसेवन आणि अवैध तस्करीविरोधी दिनानिमित्त नऱ्हे येथे जनजागृतिपर कार्यक्रम झाला. राज्याच्या अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सचे पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील, भोई प्रतिष्ठानाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲड. शार्दूल जाधवर, पर्यावरण कार्यकर्ते विष्णू लांबा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीचे शशिकांत कांबळे या वेळी उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त शपथदेखील घेतली. देश महासत्तेकडे वाटचाल करत असताना, त्यात युवक-युवतींचे योगदान मोठे असणार आहे. तरुण पिढी सक्षम राहिली, तरच देशाचे नेतृत्व करू शकेल. तरुणाईला व्यसनाधीनतेकडे व वाईट प्रवृत्तींकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू असून, तोच देशाच्या प्रगतीत मोठा अडथळा आहे, असे पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले.
सध्या जगभरात पर्यायी इंधनाविषयी मोठ्या प्रमाणात काम करण्यात येत आहे. सौर ऊर्जा हा त्याचाच एक भाग. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती-तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या तर्फे ‘करिअर कट्टा’ या उपक्रमांतर्गत सोलर एनर्जी सोसायटी ऑफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या ‘सौर ऊर्जा जाणीवजागृती उपक्रम २०२५’ या स्पर्धेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाने जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक, राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच जिल्हास्तरीय विद्यार्थ्यांमध्ये श्रीकृष्ण सुरवसे याने द्वितीय, तर कादंबरी घुले या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकावला. ‘सौर ऊर्जा जाणीवजागृती उपक्रम २०२५’ या उपक्रमांतर्गत महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम झाले. त्यात विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकांसाठी आठ कार्यशाळा, दृक् श्राव्य चित्रफितींची निर्मिती, फलक, घोषवाक्य, पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
chinmay.patankar@expressindia.com