राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना, त्यांच्यावर निशाण साधल्याचे दिसत आहे. “मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किंमत नव्हती.” असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. याच विधानाबाबत माध्यमांनी पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांची प्रतिक्रिया जाणून घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार म्हणाले की, “ते राज्यपाल आहेत, भारतातील प्रत्येक व्यक्तीला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्या पदावर असताना, अनेकदा काही गोष्टी ज्या महाराष्ट्रातील जनतेचा भावना दुखवल्या जातील, त्यांना वेदना होतील अशा नंतर लोकांनी आपली भूमिका मांडण्याचं काम केल्यानंतर त्यांनी दिलगिरी देखीव व्यक्त केली, ते शब्द मागे घेण्याचं देखील काम झालं आहे. आपल्याला एक गोष्ट माहीत आहे. की जे कोणी केंद्रात प्रमुख आजपर्यंत होते, म्हणजे मला इंदिरा गांधींच्या काळापासून वेगवेगळ्या पंतप्रधांनाचा काळ आठवतो. मला तो काळ पाहायला अनुभवायला मिळाला आहे. काही काळासाठी त्यावेळेस पी.व्ही.नरसिंहराव पंतप्रधान होते, त्यावेळी मी खासदार होतो. त्या त्या वेळीची परिस्थिती फार वेगळी होती. बरेचजण वरिष्ठांना खूश करण्यासाठी, त्यांना बरं वाटण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करत असतात. पण इतरांनी केल्यानंतर त्याची इतकी नोंद घेतली जात नाही. परंतु ज्यावेळी एखाद्या जबाबदार मान्यवाराने तशाप्रकारचं वक्तव्य केलं, तर त्याची मात्र नोंद घेतली जाते. शेवटी महत्त्वाच्या पदावर बसणाऱ्या प्रत्येकाने तारतम्य बाळगूनच वक्तव्य केली पाहिजेत. एवढंच मी सांगेन.”

तसेच पुढे ते म्हणले की, मावळमध्ये सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून केला. त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अशा घटना कोणाच्याही काळात घडू नयेत. कायद्यात सुधारणा करून कायदा कडक केला पाहिजे. असं कृत्य करण्याचं धाडस कोणी केलं नाही पाहिजे. जगातील काही देशात असं अमानुष कृत्य केल्यास कठोर शिक्षा दिली जाते.”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A person in an important position should be polite when speaking ajit pawars reaction on governor koshyaris statement msr 87 kjp
First published on: 07-08-2022 at 11:11 IST