तपासासाठी आरोपीला पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितल्याने टोळक्याने पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी आठ ते दहा जणांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस नाईक अजिज जब्बार मेस्त्री असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी अतुल गौड, दिनेश मारवाडी, आकाश चोर, विनायक शिंदे, प्रशांत शिंदे, वैभव साठे यांच्यासह आठ जणांच्या विरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>Kasba Chinchwad by-election: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीमध्ये आता ‘आप’ची एन्ट्री
लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अतुल गौड याच्या विरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी अतुल गौड याला पोलीस ठाण्यात हजर राहण्यास मेस्त्री यांनी सांगितले होते. लोणावळा परिसरातील ओकळाईवाडी परिसरात आरोपींनी पोलीस कर्मचारी मेस्त्री यांना गाठले. आरोपी विनायक शिंदे आणि साथीदारांनी पोलीस कर्मचारी मेस्त्री यांच्या डोक्यात दगड मारला. आरोपी वैभव साठे याने मेस्त्री यांना गजाने मारहाण केली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून सहायक पोलीस निरीक्षक कारंडे तपास करत आहेत.