पुणे : पॅराथायरॉईड ग्रंथीचा कर्करोग हा अतिशय दुर्मीळ मानला जातो. वर्षभरात एक कोटी जणांमागे केवळ ३ ते ५ रुग्णांमध्ये हा आजार आढळून येतो. या कर्करोगाचे निदान करणेही अवघड असते. अशा ६२ वर्षीय कर्करुग्णावर पुण्यातील रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा रुग्ण बऱ्याच काळापासून अशक्तपणा, हाडे दुखणे, मूत्रपिंडांची तक्रार घेऊन रुग्णालयात आला होता. त्याला दोन वर्षे मूत्रपिंडाची समस्या होती आणि त्यासाठी तो औषधेही घेत होता. वैद्यकीय चाचण्यांमधून रुग्णाच्या ‘प्रायमरी हायपरथाईरॉईडिझम’चे निदान झाले. रुग्णाच्या थायरॉईड ग्रंथीच्या दोन्ही बाजूस दोन गाठी दिसत होत्या. त्यापैकी कर्करोगाची गाठ कोणती हे निश्चित करणे आव्हान होते. त्यामुळे, ‘नीडल पीटीएच लेव्हल’ ही विशेष चाचणी करण्यात आली. त्यात ग्रंथीच्या उजव्या बाजूची गाठ हीच रोगाचे मूळ असल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती बाणेरमधील मणिपाल हॉस्पिटलमधील डॉ. विक्रांत गोसावी यांनी दिली.

हेही वाचा…‘#वेकअप पुणेकर’! तुमच्या नागरी समस्यांवर आता तुम्हीच सुचवा उपाय

कर्करोगतज्ज्ञ डॉ. राहुल वाघ यांनी रुग्णाच्या थायरॉईड ग्रंथीच्या उजव्या बाजूची गाठ काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया ऑन्कोलॉजीच्या सिद्धांतानुसार करण्यात आली. त्यामुळे पहिल्याच शस्त्रक्रियेनंतर रुग्ण बरा झाला आणि पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची गरज पडली नाही. तसेच रुग्णाच्या मानेला डाव्या बाजूस अनावश्यक शस्त्रक्रिया करण्याचे टाळणे शक्य झाले. शिवाय, रुग्णाला रेडिएशनसारख्या सहायक उपचारांची गरज लागली नाही.

हेही वाचा…पुणेकरांच्या मिळकतकरात वाढ? महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय…

पॅराथायरॉईड कर्करोगामुळे काय घडते ?

पॅराथायरॉईड संप्रेरक हा धान्याच्या आकारच्या चार पॅराथायरॉईड ग्रंथींमधून तयार होतो. या चार पॅराथायरॉईड ग्रंथी आपल्या मानेत थायरॉईड ग्रंथीच्या आजूबाजूस असतात. यापैकी एखाद्या ग्रंथीत गाठ निर्माण झाली तरी ‘प्रायमरी हायपरथायरॉईडिझम’उद्भवतो. या गाठीमुळे थायरॉईडची प्रमाणाबाहेर आणि अनियंत्रित निर्मिती होते. त्यातून रक्तातील कॅल्शियमची पातळी वाढते आणि हाडे कमजोर होतात व मूत्रपिंडांना इजा होते. रुग्णामध्ये लक्षणे दिसू लागल्यानंतरही सुमारे ५ वर्षांपर्यंत त्याचे निदान होत नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A pune hospital successfully treated a patient with parathyroid cancer learn more about this rare disease treatment pune print news stj 05 psg
First published on: 05-02-2024 at 09:41 IST