पुणे : गणेशोत्सव, नवरात्रासाठी बेदाण्याला मागणी वाढली होती. ही मागणी दिवाळीमुळे कायम आहे. तासगावच्या बेदाणा बाजारात दर्जेदार बेदाण्याच्या दरात दहा ते पंधरा रुपये वाढ झाली असून, दर्जेदार बेदाण्याला प्रति किलो २०० ते २२५, तर मध्यम प्रतीच्या बेदाण्याला १५० ते २०० रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. दिवाळीपर्यंत स्थानिक बाजारातील तेजी कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

व्यापारी शक्यतो नवरात्र आणि दिवाळीसाठी एकाच वेळी बेदाणा खरेदी करतात. व्यापाऱ्यांनी यंदाची खरेदी ऑगस्ट महिन्यातच पूर्ण केली आहे. तरीही राज्यातून आणि राज्याबाहेरूनही मागणी कायम असल्यामुळे मागणी टिकून आहे. त्यामुळे तासगावच्या बेदाणा बाजारात शेतकऱ्यांना दर्जेदार एक नंबरच्या बेदाण्याला २०० ते २५० रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. पंधरा ऑक्टोबपर्यंत बेदाणा सौदे सुरू राहण्याची शक्यता असून, तोपर्यंत दरातील तेजीही टिकून राहील, अशी माहिती सांगली-तासगाव बेदाणा र्मचट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार यांनी दिली.

यंदाच्या हंगामात अवकाळीसह अन्य अडचणी येऊनही राज्यात सुमारे १ लाख ६० हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले होते. नवा बेदाणा एप्रिल-मे महिन्यात बाजारात आल्यापासूनच दर दबावाखाली होते.  त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा शीतगृहात साठवून ठेवण्याला प्राधान्य दिले होते. मोठी प्रतीक्षा करूनही वर्षभर दरात फारशी वाढ झाली नाही, आता नवीन द्राक्ष हंगाम सुरू झाला तरीही अनेक शेतकऱ्यांचा बेदाणा विकलेला नाही. गणेशोत्सवापासून दरात वाढ होण्यास सुरुवात होते. मोठे व्यापारी गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीसाठी एकाच वेळी खरेदी करतात. त्यामुळे दरात दरवर्षी चांगली वाढ होते. यंदा जेमतेम दहा ते पंधरा रुपयांची वाढ झाली आहे.

एका आठवडय़ात..

राज्यात तासगाव, सांगली आणि पंढरपूर येथील बाजार समितींमध्ये प्रामुख्याने बेदाण्याचे सौदे होतात. या बाजार समित्यांना सौद्याचे दिवस ठरवून दिले आहेत. या सौद्यांमध्ये एका आठवडय़ात सुमारे अडीच ते साडेतीन हजार टन बेदाण्याची विक्री होते.

दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मागील महिनाभरापासून बेदाण्याचे दर तेजीत आहेत. सांगली जिल्ह्यातील शीतगृहात अद्यापही मोठय़ा प्रमाणावर बेदाणा आहे. दरातील ही तेजी दिवाळीनंतरही कायम राहील. शेतकरी नियोजनपूर्वक बेदाणा विक्री करताना दिसत आहेत. वर्षभर टप्प्याटप्याने बेदाणा विक्री होत असल्यामुळे दर टिकून आहेत.

– राजेंद्र कुंभार, अध्यक्ष, सांगली-तासगाव बेदाणा र्मचट असोसिएशन

साडेतीन हजार टन बेदाण्याची विक्री

राज्यात तासगाव, सांगली आणि पंढरपूर येथील बाजार समितींमध्ये प्रामुख्याने बेदाण्याचे सौदे होतात. या बाजार समित्यांना सौद्याचे दिवस ठरवून दिले आहेत. या सौद्यांमध्ये एका आठवडय़ात सुमारे अडीच ते साडेतीन हजार टन बेदाण्याची विक्री होते. मागील महिनाभरापासून देशभरातील व्यापारी येथे तळ ठोकून आहेत. रमजानच्या महिन्यात आखाती देशांतून मागणी वाढते, त्यामुळे रमजानच्या अगोदर एक महिनाभर बाजारात अशीच मोठी उलाढाल होत असते.