वर्षभरापूर्वी कोथरुड भागातून मोटार चोरून पसार झालेल्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. चोरट्याने पोलिसांपासून वाचण्यासाठी स्वत:चा मृत्यू बनाव रचला. मध्यप्रदेशातील एका वर्तमानपत्रात त्याने नातेवाईकांमार्फत मृत्यूची बातमी छापून आणली. पोलीस तपासात चोरटा हयात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
हेही वाचा >>>पुणे:‘कसब्या’तील रणनीती ठरविण्यासाठी भाजप-बाळासाहेबांची शिवसेनेची उद्या पहिली संयुक्त बैठक
विवेक मिश्रा (रा. महेर, जि. सतना, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. मिश्रा याचे कोथरुड भागात पंक्चरचे दुकान होते. वर्षभरापूर्वी त्याने कोथरुड परिसरातून मोटार चोरली होती. त्याने पौड परिसरातून दुचाकी चोरली होती. चोरी करुन मिश्रा मूळगावी गेला. त्याने नातेवाईकांमार्फत स्वत:च्या मृत्यूची बातमी एका वर्तमानपत्रात छापून आणली होती. मिश्रा याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना प्राथमिक तपासात मिळाली होती. त्यानंतर मध्यप्रदेशातील मिश्रा याच्या मूळगावी पोलिसांचे पथक गेले होते. तेव्हा त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना नातेवाईकांनी दिली. वृतपत्रातील मृत्यूच्या बातमीचे कात्रण त्यांनी तपास पथकाला दाखविले होते, असे कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा >>>कोयता गँगला रोखण्यासाठी पोलीस आक्रमक, १४ सराईत गुंड तडीपार; ‘एमपीडीए’अंतर्गत दोन गुन्हेगार स्थानबद्ध
पोलिसांच्या तपासात मिश्रा हयात असल्याची माहिती मिळाली. तो चोरी केलेली मोटार वापरत होता. मोटारीच्या वाहन पाटीवरील क्रमांक बदलून तो पुण्यात आला असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक माळी, दहिभाते, चौधर यांना मिळाली. त्यानंतर त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याकडून वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक आयुक्त रुक्मिणी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे, उपनिरीक्षक माळी, चौधर, सुळ, शिर्के, राठोड, वाल्मिकी, दहिभाते, शेळके आदींनी ही कारवाई केली.