पुणे : आठ दशकांपूर्वी सेवाग्राम आश्रमात वास्तव्य करून लुई फिशर या अमेरिकी पत्रकाराने लिहिलेली ‘ए वीक विथ गांधी’ ही रोजनिशी प्रथमच मराठी वाचकांसाठी खुली होत आहे. ज्येष्ठ पत्रकार-लेखक अंबरिश मिश्र यांनी अनुवादित केलेल्या ‘गांधींच्या सहवासात एक आठवडा’ या पुस्तकासह ‘साधना साप्ताहिका’च्या विशेषांकाचे प्रकाशन गुरुवारी (१३ ऑगस्ट) ‘साधना साप्ताहिका’च्या वर्धापनदिन कार्यक्रमात होणार आहे.
‘३ ते १० जून १९४२ या कालावधीत अमेरिकी पत्रकार लुई फिशर हे सेवाग्राम आश्रमात राहिले होते. दररोज दुपारी एक तास गांधींची मुलाखत, संध्याकाळी गांधींसोबत फिरायला जाणे, दोन्ही वेळचे जेवण गांधींसमवेत घेणे आणि उर्वरित वेळेत आश्रमवासीयांसमवेत संवाद साधणे असा फिशर यांचा दिनक्रम होता. त्या आठवड्याची रोजनिशी त्यांनी लिहिली. ती ‘ए वीक विथ गांधी’ या नावाने १९४३ मध्ये पुस्तकरूपाने आली होती. इंग्रजी वाचकांना हे पुस्तक माहीत असले, तरी गेली आठ दशके हे लेखन मराठी वाचकांपासून दूर होते. ही उणीव ध्यानात घेऊन साधना प्रकाशनाच्या वतीने हे पुस्तक मराठीमध्ये खुले करण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ठ लेखक अंबरिश मिश्र यांनी या पुस्तकाचा अनुवाद करताना फिशर यांच्या लेखनातील प्रवाहीपणा मराठीमध्ये चपखलपणे आणला आहे,’ अशी माहिती साधना प्रकाशनाचे विश्वस्त आणि साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी दिली.
‘साने गुरुजींनी १५ ऑगस्ट १९१८ रोजी सुरू केलेल्या ‘साधना साप्ताहिका’चे स्वातंत्र्यदिनी ७९ व्या वर्षात पदार्पण होत आहे. वर्धापन दिन विशेषांकामध्ये लुई फिशर यांनी लिहिलेल्या ‘ए वीक विथ गांधी’ या रोजनिशीचा अनुवाद आहे. जूनमधील १९४२ च्या पहिल्या आठवड्यात फिशर सेवाग्राम आश्रमात गांधींच्या सहवासात राहिले होते. ‘चले जाव’ चळवळ सुरू करण्यापूर्वी गांधींच्या मनात काय खळबळ सुरू होती, हे त्या रोजनिशीतून सूचित होते. या पुस्तकात अनुवाद का करावासा वाटला हे सांगणारे अंबरिश मिश्र यांचे मनोगत आणि ‘लुई फिशर हा पत्रकार नेमका होता तरी कसा’ हे सांगणारा त्यांचा लेख समाविष्ट आहे. एक सर्वांग सुंदर रोजनिशी आणि तिचा तेवढाच उत्तम अनुवाद ही एक बौद्धिक मेजवानी असेल,’ असा विश्वास शिरसाठ यांनी व्यक्त केला.
एस. एम. जोशी सभागृह येथे १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात गोव्यातील ज्येष्ठ लेखक-कवी व राजकीय-सामाजिक कार्यकर्ते दत्ता दामोदर नाईक यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (एमकेसीएल) मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
अमेरिकी पत्रकार लुई फिशर यांनी १९५० मध्ये ‘लाइफ ऑफ महात्मा गांधी’ हे पुस्तक लिहिले. ते आधाराला घेऊन १९८२ मध्ये ‘गांधी’ हा इंग्रजी आणि हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. त्याला सात ऑस्कर पुरस्कार मिळाले, हा नंतरच्या काळातील इतिहास आहे. – विनोद शिरसाठ, संपादक, साप्ताहिक साधना
‘ए विक विथ गांधी’ हा पौर्वात्य-पाश्चात्य संस्कृतीचा समंजस संवाद आहे. दोन्ही विचारपरंपरेतल्या शुभमय तत्त्वांचं सुभग दर्शन पुस्तकात घडतं. जगातल्या सर्वशक्तिमान सत्ताधीशांची मग्रुरी पाहून झाली आणि फिशर भारतात आले. गांधीजी त्यांना पहिल्या पावसासारखे वाटले. ‘जलते हुए जंगल पर जैसे बरखा बरसे रुक रुक, थम थम…’. राजकारण हे सत्तेसाठीच करायचं असतं असं युरोप-रशियातले हुकूमशहा म्हणत होते. तर राजकारण माणसांसाठी असतं हे गांधीजींचं मूळ तत्त्व होतं. म्हणून रशियन जनतेनं स्टॅलिनची आज्ञा पाळली तर भारतीयांनी गांधींवर प्रेम केलं, असं फिशर म्हणतात. अंबरीश मिश्र, अनुवादक
