पिंपरी: कंपनीत कामावर निघालेल्या महिलेला तोंड दाबून निर्जनस्थळी ओढत नेऊन, तिच्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी (१३ मे) रात्री साडेदहाच्या सुमारास चाकणजवळील मेदनकरवाडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी रात्री आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला रात्रपाळीत कामासाठी कंपनीत निघाली होती. या वेळी आरोपीने तिचा पाठलाग करून खंडोबा मंदिराजवळ तिचा रस्ता अडवला. त्यानंतर जबरदस्तीने तिला ओढून निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर अत्याचार केले.
महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. आरोपीचा चावाही घेतला. आरोपीने पळ काढल्यानंतर महिलेने एक कामगार महिला आणि पुरुष यांच्या मदतीने पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून घटनेची माहिती दिली. महिलेला तातडीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, गुन्हे शाखेची पथके आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथक आणि फॉरेन्सिक पथकांची मदत घेण्यात आली. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणही तपासण्यात आले. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ पुढील तपास करत आहेत. ‘आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, चौकशी सुरू आहे,’ असे परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.
आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ पुढील तपास करत आहेत.