आयटी हब असणाऱ्या हिंजवडीत संगणक अभियंता असलेल्या महिलेला वाढदिवसाच्या पार्टीत बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ३४ वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पीडित ३२ वर्षीय महिला आणि आरोपी हे दोघे ही संगणक अभियंता आहेत अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे. त्यांची ओळख लग्न जुळवण्याच्या वेबसाईटवर झाली होती. आरोपीने लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३२ वर्षीय महिला आणि ३४ वर्षीय आरोपी या दोघांचा दुसरा विवाह होणार होता. लग्न जुळवण्याच्या वेबसाईटवर त्यांची ओळख झाली होती. आरोपीने लग्न करायचं आहे सांगत पीडितेचा विश्वास संपादन केला. त्यांच्यात ओळख झाल्यानंतर फोन, चॅटिंग सुरु झालं. त्यांच्यातील भेटीदेखील वाढल्या होत्या.

२१ नोव्हेंबरला पीडित महिलेला आरोपीने आपल्या वाढदिवसाच्या पार्टीत बोलावले. पार्टी झाल्यानंतर ‘तू एकटी घरी जाऊ नकोस उशीर झाला आहे, उद्या सकाळी जा’ असे सांगून पीडितेला थांबवून घेतलं. दरम्यान, आरोपी पीडितेला घरी घेऊन गेला अन् तिथे बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले असं तक्रारीत म्हटलं आहे. तर, काही दिवसांनी पीडितेला आरोपीने विवस्त्र करून विनयभंग केला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

नंतर आरोपीने पीडित महिलेशी दुरावा निर्माण करत संपर्क तोडला. यामुळे आपल्याला लग्नाचं अमिष दाखवून बलात्कार झाल्याचं समजल्यानंतर महिला तणावात होती. पीडित महिलेने तणावातून बाहेर येताच आणि आरोपीचा संपर्क न झाल्याने हिंजवडी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली आहे. त्यानुसार ३४ वर्षीय आरोपीविरोधात विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपी मोकाट असून महिला पोलीस उपनिरीक्षक बोरकर अधिक तपास करत आहेत. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A woman raped on promise of marriage in pune kjp 91 sgy
First published on: 25-01-2022 at 12:33 IST