scorecardresearch

गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेला दोन कोटींचा गंडा; खासगी वित्तीय संस्थेचा संचालक दुबईत पसार

गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने एका महिलेची दोन कोटी रुपयांची फसवणूक करून खासगी वित्तीय संस्थेचा संचालक दुबईत पसार झाल्याचे उघडकीस आले आहे.

woman cheated two crores pune
गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेला दोन कोटींचा गंडा; खासगी वित्तीय संस्थेचा संचालक दुबईत पसार (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)

पुणे : खासगी कंपनीतील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने एका महिलेची दोन कोटी रुपयांची फसवणूक करून खासगी वित्तीय संस्थेचा संचालक दुबईत पसार झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत एका महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, विक्रांत रमेश पाटील (वय २५, रा. मोराळे, पलूस, जि. सांगली) आणि संतोषकुमार विष्णू गायकवाड (रा. बलवडी, ता. खानापूर, जि. सांगली) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – लोणावळा : एकवीरा देवीच्या यात्रेनिमित्त कार्ला परिसरात सोमवारपासून तीन दिवस दारुबंदी

आरोपी विक्रांत पाटील आणि संतोषकुमार गायकवाड यांनी प्रभात रस्त्यावर कार्यालय सुरू केले होते. त्यांनी आभासी चलन, कंपनीतील समभागात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले होते. तक्रारदार महिला एनडीए रस्त्यावरील शिवणे परिसरात राहायला आहे. तिच्या पतीचा व्यवसाय आहे. आरोपी गायकवाड याची महिलेशी ओळख झाली होती. गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष त्याने महिलेला दाखविले होते.

महिलेने सुरुवातीला आराेपी पाटील आणि गायकवाड यांना एक कोटी रुपये गुंतविण्यास दिले. गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्यात येईल, असे आमिष आरोपींनी तिला दाखविले. त्यानंतर महिलेकडून दोघांनी पुन्हा ८० लाख रुपये घेतले. गेल्या वर्षी मार्च महिन्यात आणखी एक योजना सुरू होणार असून या योजनेत गुंतवणूक करा, असे आरोपींनी महिलेला सांगितले होते. आणखी २० लाख रुपये जमा केल्यास तुम्हाला दोन कोटी रुपयांच्या रक्कमेवर ५० लाख रुपये नफा मिळेल. मूळ मुद्दल आणि नफ्यासह अडीच कोटी रुपये मिळतील, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर महिलेने आरोपींच्या प्रभात रस्त्यावरील कार्यालयात २० लाख रुपये दिले. त्यानंतर आरोपी पाटील आणि गायकवाड दुबईला गेले.

हेही वाचा – लोणावळ्यात शाळकरी मुलावर जीवघेणा हल्ला, तीन अल्पवयीन मुले ताब्यात

महिलेच्या पतीने दोघांशी संपर्क साधला. तेव्हा त्यांचे मोबाईल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. प्रभात रस्त्यावरील कार्यालय आरोपींनी बंद केल्याचे समजल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 16:26 IST

संबंधित बातम्या