scorecardresearch

पुणे: ॲपवरुन रस्ता शोधण्याच्या प्रयत्न जीवावर बेतला; बाह्यवळण मार्गावर अपघातात संगणक अभियंता युवतीचा मृत्यू

ॲपवरुन रस्ता शोधण्याचा प्रयत्न जीवावर बेतल्याची घटना उघडकीस आली आहे.

dead-body
(प्रातिनिधिक फोटो-लोकसत्ता)

ॲपवरुन रस्ता शोधण्याचा प्रयत्न जीवावर बेतल्याची घटना उघडकीस आली आहे. सिंहगडावर मैत्रिणीबरोबर फिरायला गेलेला युवक ॲपवरुन रस्ता शोधण्याचा प्रयत्न असताना चुकीचा मार्ग ॲपने दिला. महामार्गावर वळण घेत असताना भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील सहप्रवासी संगणक अभियंता युवतीचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग परिसरात घडली.

हेही वाचा >>>पुणे: अतिप्रसंगास विरोध केल्याने अल्पवयीन मुलीवर ॲसिड फेकण्याचा प्रयत्न

रिदा इम्तियाज मुकादम (वय २३, रा. खराडी) असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार नटराज अनिलकुमार (वय ३०, रा. वानवडी) जखमी झाला आहे. रिदा आणि नटराज खराडी भागातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत संगणक अभियंता आहेत. दोघे सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेले होते. सिंहगडावरुन दोघे परतत होते. त्यांना वानवडीला जायचे होते. त्यांनी मार्ग दाखविणाऱ्या ॲपचा वापर केला. वानवडीला जाण्यासाठी मार्ग शोधत असताना ॲपने मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग दाखविला. दुचाकीस्वार नटराज आणि रिदा बाह्यवळण मार्गावरुन नवीन कात्रज बोगद्याकडे गेले. खेडशिवापूरकडे निघाल्याचे लक्षात आल्यानंतर दुचाकीस्वार नटराज मार्ग चुकल्याचे जाणवले.

हेही वाचा >>>पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी १५ रस्त्यांचे सर्वेक्षण; पोलीस, महापालिका, मेट्रो, पीएमपीएल अधिकाऱ्यांची समिती स्थापन

नवीन कात्रज बोगद्याजवळून दुचाकीस्वार नटराज वळत होता. त्या वेळी भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी रिदा आणि नटराज जखमी झाले. रिदाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. याबाबत दुचाकीस्वार नटराज याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पसार झालेल्या ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 18:14 IST
ताज्या बातम्या