लोणावळा : टायगर पाॅईंटजवळ भरधाव दुचाकी घसरुन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले. मोहन ज्ञानेश्वर मोरे (वय २२, सध्या रा. बंडगार्डन रस्ता, मूळ रा. पिंपळगावर सय्यदमियाँ, परभणी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातात श्रीराम संजय माेरे (वय १९, सध्या रा. बंडगार्डन रस्ता, मूळ रा. परभणी), रितेश सोमनाथ नलावडे (वय २१, सध्या रा. पुणे, मूळ रा. टेंभुणी, जि. सोलापूर) जखमी झाले आहेत.
मोहन मोरे, श्रीराम मोरे, रितेश नलावडे मध्यरात्री पुण्याहून दुचाकीवरुन कार्ला येथे श्री एकवीरा देवीच्या दर्शनासाठी आले होते. मध्यरात्री मंदिर बंद होते. त्यामुळे तिघे जण दुचाकीवरुन लोणावळ्यातील टायगर पाॅईंट येथे फिरायला आले. पहाटे पाचच्या सुमारास तिघे जण दुचाकीवरुन कार्ला येथे दर्शनासाठी निघाले होते.




हेही वाचा >>> पुणे : शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचाराचा प्रकार समुपदेशनात उघड
टायगर पाॅईंट ते आयएनएस शिवाजी दरम्यान असलेल्या रस्त्यावरुन तिघे जण दुचाकीवरुन निघाले होते. तीव्र उतारावर दुचाकीस्वार मोहन मोरे याचे नियंत्रण सुटले आणि मोहन याला गंभीर दुखापत झाली. अपघातात श्रीराम आणि रितेश जखमी झाले. त्या वेळी तेथून निघालेल्या मोटारचालकाने तिघांना त्वरीत खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वी मोहन याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. अपघातात श्रीराम, रितेश यांना दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती लोणावळा पोलिसांनी दिली.