राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते श्रीराम राघवन यांच्या नावाने बनावट फेसबुक व इन्स्टाग्राम खाते तयार केल्याच्या आरोपाखाली वर्सोवा पोलिसांनी एका तरूणाला तामिळनाडूमधून अटक केली. आरोपी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंता आहे. आपल्या नावाने बनावट फेसबुक व इन्स्टाग्राम खाते तयार करून अज्ञात व्यक्ती काही मॉडेल्स व उदयोन्मुख अभिनेत्रींशी संपर्क साधत असल्याची माहिती श्रीराम यांना मिळाली होती. याप्रकरणी त्यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तोतयागिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा- मुंबई: रिक्षा-टॅक्सीचा पाच किलोमीटरपर्यंतचा प्रवास महागला; रात्रीच्या प्रवासासाठी खिशाला खार

श्रीराम यांच्या नावाने समाजमाध्यमांवर तयार करण्यात आलेल्या बनावट खात्याची माहिती अनेकांनी त्यांना दिली. श्रीराम यांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. आरोपी तरुणींशीही संपर्क साधत असल्याचेही त्यांना समजले. आरोपीने आपल्याची संपर्क साधल्याची बाब एका तरुणीने श्रीराम यांच्या निदर्शनास आणून दिली होती. आरोपीने या तरुणीला नग्न छायाचित्रासाठी चित्रीकरण करण्यास सांगितले होते. हा प्रकार कळाल्यानंतर श्रीराम यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी मार्च महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा- मुंबईतील बस थांब्यांवर लवकरच मोबाइल चार्जिंग, वायफाय सुविधा; वर्षभरात १,५६० बस थांब्यांचे नूतनीकरण व पुनर्बांधणी करणार

या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी तामिळनाडू येथील तिरुचेंगोडे येथून ३१ वर्षीय तरुणाला अटक केली. शंमुगा वाडिवेल थंगवेल असे या तरुणाचे नाव असून त्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेतले आहे.