पुणे : शनिवार पेठेतील मुठेश्वर मंदिराजवळ पदपथावर झोपण्यावरुन झालेल्या वादातून तरुणाच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून त्याला पेटवून देण्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेत तरुण गंभीर भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिलिंद सिद्धपा होसकुटी (वय ३८, रा. इंदिरानगर वसाहत, खडकी) असे भाजलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी बालमुकुंद पंडित (वय ५९, रा. बिबवेवाडी) याला अटक केली आहे. आरोपी पंडित आणि होसकुटी फिरस्ते आहेत. सोमवारी रात्री होसकुटीला घरी जाण्यास उशीर झाल्याने तो शनिवार पेठेतील मुठेश्वर मंदिराजवळ असलेल्या मोकळ्या जागेत झोपला. त्या वेळी तेथे झोपण्यावरुन आरोपी पंडित याच्याशी त्याचा वाद झाला. पंडितने त्याला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. होसकुटी मुठेश्वर मंदिराजवळ असलेल्या वाचनालयाच्या जागेत झोपला.




हेही वाचा >>>शरद पवारांच्या मध्यस्थीनंतरही शिरूर मतदारसंघाचा तिढा सुटेना? विलास लांडेंच्या वक्तव्यानंतर चर्चेला पुन्हा सुरुवात
त्यानंतर मध्यरात्री पंडितने गाढ झोपेत असलेल्या होसकुटीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून दिले. त्याचा हात आणि छातीला भाजले असून वाचनालयातील फलकही जळाला. पंडित याच्या विरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करणात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संजय निकुंभ तपास करत आहेत.